नागपूर : सायबर गुन्हेगाराने पळवलेली रक्कम परत मिळविणे फार कठीण असते, मात्र शहरातील एका प्रकरणात सायबर गुन्हेगाराकडे गेलेली रक्कम यशस्वीपणे व्यावसायिकाला परत मिळाली. सायबर गुन्हेगाराने गुंतवणुकीचे आमिष देवून व्यावसायिकाची ४ लाख २८ हजार रूपयांनी ऑनलाईन फसवणूक केली होती. ही रक्कम आरोपीच्या एका खासगी बँकेत जमा झाली होती. ही जमा झालेली रक्कम व्यावसायिकाला परत देण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एच. उके यांंनी संबंधित बँकेला दिले आहेत. मदनलाल परमेश्वरलाल अग्रवाल असे याचिकाकर्त्या व्यावसायिकाचे नाव आहे. व्यावसायिक नागपूर येथील संत्राबाजार परिसरातील रहिवासी आहे.

सायबर गुन्हेगाराने अग्रवाल यांना गुंतवणुकीचे आमिष देवून त्यांच्याकडून आपल्या बँकेच्या खात्यात ४ लाख २८ हजार रुपये ऑनलाईन वळते करून घेतले होते. याप्रकरणी अग्रवाल यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर शहर सायबर पोलिसांनी बँकेतील ही रक्कम गोठविली होती. त्यामुळे अग्रवाल यांनी ही रक्कम परत मिळावी, याकरिता अग्रवाल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. तपास अधिकाऱ्यांनी संबंधित रक्कम अग्रवाल यांच्या मालकीची असल्याचे न्यायालयाला सांगितले. आरोपीने अग्रवाल यांची फसवणूक करून ४ लाख २८ हजार रुपए त्यांच्या खात्यातून आपल्या बँकेच्या खात्यात ऑनलाईन वळते करून घेतले. यानंतर लागलीच आरोपीचे बँक खाते बंद झाले होते. आरोपी खातेधारकाला पोलिसांनी नोटीस बजावली होती. परंतु बजावलेली नोटीसला आरोपीने उत्तर दिले नाही. दरम्यान आरोपी खातेधारक न्यायालयात हजर देखील झाला नाही. त्यामुळे त्याचे बँक खाते गोठविण्यात आले होते. यानंतरही आरोपी खातेधारक न्यायालयात हजर झाला नाही वा त्याने कारवाईवर कोणताही आक्षेप घेतला नाही. अग्रवाल यांनी गोठविलेली रक्कम परत मिळण्याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने सर्व पुराव्यांच्या आधारावर निर्णय दिला. अग्रवाल यांच्या जय अंबे एंटरप्राईजेसच्या बँक खात्यात ४ लाख २८ हजार रुपए वळते करण्याचे आदेश नागपुरातील बँकेच्या मुख्य शाखेला दिले. अग्रवाल यांच्याकडून रक्कमेच्या मालकीबाबत हमीपत्र घेत त्यांना रक्कम परत करण्याचे आदेश दिलेत. मदनलाल अग्रवाल यांच्यातर्फे अ‍ॅड. गझाला शेख यांनी बाजू मांडली.

हेही वाचा : ‘या’ बड्या महिला काँग्रेस नेत्यास थेट मुख्यमंत्र्यांकडूनच विधानसभेची ऑफर…पक्षात घुसमट होत….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ

शहरात सायबर फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. मागील १४ महिन्यात येथे तब्बल १५२ प्रकरणात नागरिकांची ७७.५७ कोटींनी फसवणूक झाली. त्यापैकी केवळ ३२ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले. माहितीच्या अधिकारातून हा तपशील समोर आला. उल्लेखनीय आहे की नागपूर शहरात १ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली होती. तरीदेखील अगदी निवडक प्रकरणातच पि़डीतांना फसवणूकीची रक्कम परत मिळवून देण्यात सायबर पोलीस यशस्वी ठरत आहेत.