नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात परत एकदा गँगवॉर भडकले. कारागृहातील बॅरेक क्रमांक तीनमध्ये कुख्यात गुंड चेतन हजारे याच्यावर दुसऱ्या एका कैद्याने टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात हजारे जखमी झाला. कारागृह कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.
चेतन हजारे हा बाल्या बिनेकर हत्याकांडाचा आरोपी आहे. तो बॅरेक क्रमांक तीनमध्ये कैद आहे. त्याच्याच बॅरेकमध्ये समीर अहमद सगीर अहमद हा आरोपीदेखील आहे. कारागृहात चेतन हजारेची दहशत असून अनेक कैदी त्याच्या सूचनांचे पालन करतात. समीरला हीच बाब खटकत होती व त्यांच्यात वर्चस्वावरून वाद होता. कारागृह प्रशासनाने ही बाब गंभीरतेने न घेता त्यांना एकाच बॅरेकमध्ये ठेवले.
हेही वाचा…सुधीर मुनगंटीवार म्हणतात,’ जोरगेवारांनी आता मदत केली नाही तर मी त्यांना…
सोमवारी पहाटे त्यांच्यात वाद झाला व समीरने टिनाच्या पत्र्याने हजारेवर वार केले. यामुळे बॅरेकमध्ये खळबळ उडाली. आरडाओरड ऐकून दिनेश कुंजाम व संजय श्रीवास्तव यांनी बॅरेकच्या दिशेने धाव घेतली. बॅरेकच्या चाब्या बोलविण्यात आल्या व दरवाजे उघडण्यात आले. समीरने हजारेच्या पाठ व हातावर वार केले होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बॅरेकमध्ये शिरत दोघांना वेगळे केले. जखमी चेतनला कारागृहाच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कारागृहाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी धंतोली पोलिसांना घटनेची माहिती दिली. धंतोली पोलिसांनी समीर अहमदविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि कारागृह कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.