नागपूर : कारागृहातील जीवन फार कठीण असते. अनेक कैदी हे छोट्या चुकांमुळे कारागृहात जातात. अनेकदा त्यांची जामिनावर सुटकाही होऊ शकते. मात्र, पैशांअभावी त्यांना कारागृहातच दिवस काढावे लागतात. नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अनेक वर्षांपासून बंद असलेल्या १८ कैद्यांना आता मोकळ्या हवेत श्वास घेण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) प्यारे खान यांच्या पुढाकाराने या सर्व कैद्यांच्या जामीनाची रक्कम भरून त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात १४ कैद्यांची मुक्तता गुरुवारी कारागृह प्रशासनाला आदेश प्राप्त झाल्यानंतर करण्यात आली, तर उर्वरित चार कैद्यांची लवकरच मुक्तता होणार आहे.

४ जून रोजी नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या भेटीदरम्यान प्यारे खान यांना माहिती मिळाली की, अनेक असे कैदी आहेत ज्यांचा जामीन मंजूर झाला आहे. परंतु आर्थिक परिस्थिती खराब असल्याने २ ते ५० हजार रुपयापर्यंतची जामीन रक्कम भरू शकत नाहीत. यावर त्यांनी कारागृह अधीक्षक वैभव आगे आणि जिल्हा न्यायिक अधिकारी ऋषिकेश ढाले यांनी जे गंभीर गुन्हेगार नाहीत, सवयीचे गुन्हेगार नाहीत आणि ज्यांचे कारागृहातील आचरण चांगले आहे, अशांची ओळख पटपण्याचे आदेश दिले. यानंतर कारागृह प्रशासन आणि वकिलांच्या मदतीने अशा १८ पात्र कैद्यांची यादी तयार करण्यात आली. यादी प्राप्त होताच खान यांनी पुढाकार घेत सर्व जामीन रक्कम स्वतः भरली, ज्यामुळे कैद्यांची मुक्तता शक्य झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुक्तीनंतर कैद्यांशी संवाद साधताना प्यारे खान यांनी कठोर इशारा दिला की, भविष्यात कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीपासून दूर राहावे. तसेच गुन्हा हा केवळ समाजाला नाही तर व्यक्ती आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करतो. त्यामुळे योग्य मार्गावर परत येणे हाच खरा सुधार आहे असेही सांगितले. मुक्त झालेल्या कैद्यांनी प्यारे खान यांचे आभार मानून हे वचन दिले की, ते आता पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गावर जाणार नाहीत आणि समाजात जबाबदार व प्रामाणिक नागरिक म्हणून जीवन जगतील. मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांमध्ये नंदकिशोर पडोळे, राकेश नरकांडे, चेतन पाल, कार्तिक ढोळे, प्रणव ठाकरे, रेखा खमारी, संतोष कतारे, ओमप्रकाश लहारे, तुषार बोपचे, संतोष राजपूत, जीतू समुद्रे, शिवा चौधरी, दिनेश सदाफुळे, अजय वारखडे यांचा समावेश आहे.