नागपूर : आतापर्यंत मुंबई, नाशिक परिसरातच बिबटे शहरात आल्याच्या घटना ऐकिवात आहेत, पण आता उपराजधानी म्हणजेच नागपूर शहर देखील त्याला अपवाद राहिलेले नाही. अलिकडच्याच काही वर्षांपूर्वी तब्बल आठवडाभर बिबट्याने शहरात मुक्काम ठोकला होता. शहरातील आयटी पार्क परिसर, व्हीएनआयटी परिसर ते अगदी शहराच्या मध्यभागी असलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयापर्यंत बिबट्याने मजल मारली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल झालेल्या व्हिडीओने पुन्हा एकदा धडकी भरवली आहे.
गोरेवाडा जंगलालगत असलेल्या काटोल नाका चौकातील बांबू विकास मंडळाच्या कार्यालयाच्या आवारात बिबट्या वारंवार घुसल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून, मंडळाच्या कार्यालयाच्या आवारात लपून बसलेल्या आणि कुत्र्याला पकडणाऱ्या बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झाले आहे. गोरेवाडा रोड काटोल नाका चौकात असलेले बांबू विकास मंडळाचे कार्यालय गोरेवाडा वनक्षेत्राला लागून आहे. बांबू बोर्डाचे कार्यालय गोरेवाड्याच्या भिंतीला लागून आहे. अनेकदा बिबट्या भिंतीवरून उडी मारून बांबू विकास मंडळाच्या कार्यालयाच्या आवारात घुसल्याच्या घटना घडल्या आहेत.
रात्रीच्या वेळी बोर्ड कार्यालयाच्या आवारात बिबट्या घुसून कुत्र्याला पकडल्याची घटनाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राचे समन्वयक व राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांच्या मते, यापूर्वीही एका बिबट्याने बांबू बोर्ड कार्यालयाच्या आवारात घुसून दोन कुत्र्यांना मारले आहे. माहिती मिळाल्यानंतर, ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या टीमनेही परिस्थितीवर लक्ष ठेवले. पण बोर्डाच्या आवारात बिबट्या दिसला नाही. गोरेवाडा वनक्षेत्र बांबू कार्यालयाशेजारी असल्याने, परिसरात बिबट्याचे अस्तित्व अनेकदा दिसून येते. काही दिवसांपूर्वी अमरावती येथील राज्य राखीव दलाच्या कार्यालयात बिबट्या चक्क पायऱ्या चढून आला होता. तर यापूर्वी देखील त्याठिकाणी बिबट्याचे अस्तित्व आढळले आहे. त्यामुळे बिबट्याचा जंगल ते गाव असा असणारा वावर आता जंगल ते शहर असा सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत मुंबई, नाशिक या जिल्ह्यातच शहरी भागात बिबट आढळून येत होते, पण आता अमरावती, नागपूर शहरातही बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वैदर्भीयांना आता वाघासोबत बिबट्यांना सामोरे जावे लागत आहे.