नागपूर : तरुण पिढीमध्ये कधी कुठला ट्रेंड लोकप्रिय होईल, याचा काही नेम नाही. सध्या तरुण पिढीमध्ये नवा ‘फेक वेडिंग पार्टी’चा ट्रेंड बघायला मिळतो आहे. यात नवरदेव आणि नवरी वगळता सर्व काही विवाह सोहळ्यासारखे असते. नागपूरमधील एका मॉलमध्ये शनिवारी अशा ‘फेक वेडिंग पार्टी’चे आयोजन केले जात आहे.
समाज माध्यमांमुळे जग वेगाने बदलत आहे. सामाजिक परंपरा नव्या रुपात बघायला मिळत आहे. लग्नसोहळ्यासारखी भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्वपूर्ण गोष्टीवरही याचा परिणाम झाला आहे. थीम आधारित लग्नसोहळा, डेस्टिनेशन वेडिंग यासारखे प्रकार प्रचलित झाल्यावर आता एकदम नवा प्रकार समोर आला. हा प्रकार आहे, ‘फेक वेडिंग पार्टी’चा. मुंबई, दिल्लीसारख्या महानगरासह नागपूरमध्येही हा प्रकार वेगाने लोकप्रिय होत आहे. नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका मॉलमध्ये अशी पार्टी झाली होती. त्यावेळी पार्टीला मिळालेल्या प्रतिसादामुळे शनिवारी पुन्हा एकदा अशाप्रकारचे आयोजन केले जाणार आहे. यात सर्व काही एखाद्या विवाह सोहळ्यासारखे असते. यात सजावट, बँड, बाजा आणि वरात अगदी खऱ्या लग्नाप्रमाणे असतात. पार्टीत सहभागी तरुण-तरुणीही शेरवानी, लहंगा यासारख्या पेहरावात येतात. नवरदेव-नवरी वगळता यात सर्व काही विवाहसोहळ्यासारखे असते.
अगदी मेहंदी, हळद, संगीत सोहळा सारेच काही याचा भाग असते. एका आयोजकाने दिलेल्या माहितीनुसार,‘ सामान्य विवाहसोहळ्यात नातेवाईकांचा सहभाग तसेच सामाजिक बंधन असते. तरुण पिढीला या गोष्टींपासून दूर राहणे पसंत आहे, मात्र विवाहसोहळ्याची मजा-मस्ती त्यांना हवी असते. या पार्श्वभूमीवर ‘फेक वेडिंग पार्टी’चा प्रकार उदयास आला आहे. काही दिवसातच हा प्रकार तरुणांमध्ये लोकप्रियही झाला आहे. अशा प्रकारच्या पार्टीमध्ये भारतीय पारंपारिक पोशाख जसे साडी, लहंगा, दागिने परिधान करून मोठ्या प्रमाणात तरुणी सहभागी होतात. येत्या काळात हा ट्रेंड आणखी लोकप्रिय होईल आणि अशाप्रकारच्या आयोजनाची संख्या वाढेल.’
आयोजनावर टीकाही
या ट्रेंडमागे अनेक कारणं दिली जात आहेत. काही लोक म्हणतात की, “फुल वेडिंग फील्स पाहिजे पण कमिटमेंट नको!” काहींना केवळ लाइक्स, फॉलोअर्स, किंवा वेगळेपणासाठी हे हवे असते. इन्फ्लुएन्सर्सनी या ट्रेंडला खूप उचलून धरले आहे. ‘फेक वेडिंग शूट’ हे आता काही फोटोग्राफर्ससाठी कमर्शियल पॅकेजसुद्धा झालं आहे. अनेकांनी याला ‘फन, फ्रीडम आणि फॅशन’ असे नाव दिले आहे. दुसरीकडे या ट्रेंडवर टीकाही होत आहे. काहींच्या मते, लग्नासारख्या गंभीर आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींचा फक्त करमणुकीसाठी वापर करणे म्हणजे विवाहसंस्थेचा अवमान आहे. यामुळे तरुण पिढीमध्ये नातेसंबंधांची गंभीरता कमी होत असल्याचा आरोप काही मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून केला जातो.