नागपूर : कोराडी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात दुपारी एकच्या सुमारास गंभीर घटना होता होता टळली. औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील ७ क्रमांकाच्या ६० मेगा वॅट वीज निर्मिती केंद्रातील ओझोन वायूची गळती झाल्याने तिथे उपस्थिती कामगारांचा श्वास गुदमरला.

श्वासोच्छवास घेताना त्रास होत असल्याची तक्रार घेऊन कामगारांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने तातडीने अलार्म सिस्टिम यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. श्वास गुदरमलेल्या सर्व कामगारांना तीन रुग्ण वाहिकेतून तातडीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. श्वास गुदमरलेल्या या १८ कामगारांपैकी कोणाचीही प्रकृती अत्यवस्थ नसून त्यांचा श्वास सामान्य केला जात असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दुपारी एकच्या सुमारास काही कामगारांना पोट फुगल्यासारखं वाटत होते. दरम्यान त्यांना श्वास घेताना त्रास होत असल्याची तक्रार कामगारांनी केली. त्यामुळे तातडीने सर्वांना मेयोतल्या अपघात विभागात दाखल करण्यात आले. प्रशासनाने या बाबत मध्ये प्रशासनाला अलर्ट देत टीम तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या घडामोडीत कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्राने वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू केला आहे.