नागपूर : शासनाने राज्यात दुचाकी टॅक्सी धोरणाला मंजूरी देत त्याबाबत हरकती व सूचनेवर काम सुरू केले आहे. परंतु या टॅक्सीला मंजूरी नसतांनाही ती धावत असल्याचे खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पुढे आणले होते. या घटनेमुळे नागपुरातही २०२२ मध्ये आरटीओ अधिकाऱ्यांनी शिताफीने दुचाकी टॅक्सीची धपरकड केल्याची आठवण जागी झाली आहे. त्यानंतर या टॅक्सीबाबतचे धक्कादायक निकाल पुढे आले होते.

शासनाने दुचाकी टॅक्सीबाबत हरकती व सूचनेवर काम सुरू केले आहे. त्याला राज्यभरातील जवळपास सगळ्याच ऑटोरिक्षा चालक- मालक संघटेसह ऑनलाईन ॲपबेस टॅक्सी चालकांनीही विरोध दर्शवला आहे. दरम्यान नागपुरात २०२२ च्या सुरवातीला शासनाने मंजूरी न घेता रॅपीडो कंपनीकडून दुचाकी टॅक्सीची सेवा सुरू केली गेली होती. त्यावर टायगर ऑटोरिक्षा संघटनेने आक्षेप घेत विलास भालेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले होते.

आरटीओ अधिकाऱ्यांवर दबाव तयार झाल्यावर सिनेस्टाईल या दुचाकी टॅक्सी चालकांची धरपकड करण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या संख्येने दुचाकी टॅक्सी जप्त करण्यात आल्यावर ही सेवाच बंद केली गेली होती. त्यानंतर आजपर्यंत या पद्धतीच्या अनधिकृत दुचाकी टॅक्सी सेवा सुरू करण्याची हिम्मत नागपुरात कुणीही दाखवली नाही. दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वत: मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर या पद्दतीची दुचाकी टॅक्सी पकडल्याने नागपुरातील आठवणीही जागृत झाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरटीओ अधिकाऱ्यांनी कसा रचला सापळा ?

नागपुरात सर्वत्र अनधिकृत दुचाकी टॅक्सीचा सुळसुळाट झाला होता. ऑटोरिक्षा चालकांच्या आंदोलनानंतर आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेत एक सापळा रचला. त्यानुसार आरटीओचे अधिकारी सकाळी लवकरच अमरावती रोडवरील त्यांच्या कार्यालयात पोहचले. येथून हे अधिकारी साध्या गणवेशात जवळपासच्या परिसरात पोहचले. तेथून अधिकाऱ्यांनी स्वत:च्या मोबाईलवर रॅपीडो कंपनीचा ॲप डाऊनलोड केला. त्यानंतर दुचाकी टॅक्सीवरून नागपूर शहर आरटीओ कार्यालय परिसरात जाण्यासाठीची बुकींग केली गेली. संबंधित टॅक्सी त्यांना घेण्यासाठी आल्यावर ते त्यावर बसून आरटीओ कार्यालय परिसरात पोहचले. येथे दबा धरून बसलेल्या इतर अधिकाऱ्यानी दुचाकी टॅक्सीला पकडून त्यावर कारवाई केली. यावेळी मोठ्या संख्येने दुचाकी टॅक्सी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर मोठ्या दंडाची रक्कम घेऊन या टॅक्सीला सोडण्यात आले. परंतु या कारवाईनंतर नागपूर शहरात एकानेही पुन्हा दुचाकी टॅक्सी सेवा सुरू करण्याची हिंमत दाखवली नाही.