नागपूर : वाठोड्यातील एका रस्त्यावर अंधारात कार उभी करून गप्पा करणाऱ्या एका प्रेमीयुगुलाला कळमना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी पंकज यादव आणि संदीप यादव यांनी लुटले होते. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी दोन्ही पोलिसांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर फरार झालेल्या पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दोघांनाही अंतरिम जामीन मंजूर केला. या प्रकरणात वाठोडा पोलिसांची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद होती. मात्र, प्रसारमाध्यमांनी प्रकरण उचलून धरल्यानंतर वाठोडा पोलीस सतर्क झाले.

ही घटना वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत १३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेची गंभीर दखल पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी घेतली होती. पोलीस विभागाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी दोन्ही पोलीस शिपायांना तडकाफडकी निलंबित केले होते. दोघेही वादग्रस्त पोलीस कळमना ठाण्यात तैनात होते. पीडित युवक बीबीएचा विद्यार्थी आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयात तो शिक्षण घेत असून तो गणेशपेठ पोलीस ठाण्यांतर्गत राहतो. पीडित विद्यार्थी त्याच्या मैत्रिणीला १३ एप्रिलला सायंकाळी कारने फिरायला घेऊन गेला होता. वाठोडा ठाण्यांतर्गत आऊटर रिंगरोडवर कार उभी करून दोघेही गप्पा मारत होते. दरम्यान कळमना पोलीस ठाण्यात कार्यरत पंकज यादव आणि संदीप यादव या दोन कर्मचाऱ्यांनी त्यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि बदनामीची भीती दाखवली व त्यांना पैशांची मागणी केली. पैसे नसल्याने युवकाच्या गळ्यातील ३ तोळ्याची सोनसाखळी हिसकावून घेतली. युवकाने या घटनेची तक्रार पाच दिवसांनी वाठोडा पोलिसांत केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही पोलीस कर्मचारी फरार होते. वाठोडा पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र, दोघेही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यांनी न्यायालयातून अंतरिम जामीन मिळवला. त्यामुळे काही दिवस तरी त्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: अकोला जिल्ह्यात बियाण्यांचा काळाबाजार, दुप्पट दराने विक्री; कृषी विभागाकडून…

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

वाठोड्याचे ठाणेेदार विजय दिघे यांनी या प्रकरणाला सुरुवातीपासून गांभीर्याने घेतले नाही. सोनसाखळी परत देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करीत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. पंकज यादव आणि संदीप यादव हे दोघेही वादग्रस्त असून वाळू माफियाकडून लाखोंची खंडणी घेत होते. वाठोडा पोलिसांना १३ एप्रिलपासून दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक करता आली नाही. तसेच दोघांचा पत्तासुद्धा लागला नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.