नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय परिसराजवळील विद्यापीठाच्या मैदानावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘राष्ट्रीय नमो युवा संमेलन’ सोमवारी होत आहे. शैक्षणिक परिसरातील मैदानात राजकीय पक्षाचा कार्यक्रम होत असल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याविरोधात आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशा विविध पक्षांनी कुलगुरूंच्या कक्षासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी कुलगुरूंना भेटण्याचा हट्ट केला असता पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये काही आंदोलक जखमींही झाले.

विद्यापीठाने राजकीय पक्ष व त्यांच्या संघटनांना कार्यक्रमासाठी मैदान देण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला जात आहे. भाजयुमोच्या ‘राष्ट्रीय नमो युवा संमेलनात राज्याच्या वेगवेगळ्या भागातील युवा सहभागी होत आहेत. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये राजकीय पक्ष आणि त्यांच्या संघटनांच्या सभा, मेळाव्यांना मैदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी काही अटी व शर्ती घालून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा…महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय आठ-दहा दिवसात -फडणवीस

विद्यापीठ यासाठी शुल्कही आकारणार आहे. मात्र, शैक्षणिक परिसरातील मैदानात राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यास विरोध होत आहे. राष्ट्रवादीच्या विदर्भ विद्यार्थी प्रमुख माधुरी पालीवाल, एनएसयुआयचे पांडे, राहुल हनवते असे अनेक लोक आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी विद्यापीठाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलक तीव्र होताच पोलिसांनी लाठीमार केला. तसेच आंदोलकांना अटक केली. यात काही जण जखमी झाले.