नागपूर : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव गडगडले आहे. यावरून राज्य सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहे. विरोधकांनी कांद्यांची माळ आणि टोपलीत कांदा घेऊन विधानभवन परिसरात मोर्चा काढला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात कांदा निर्यातबंदीचा मुद्दा गाजत आहे. कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सोमवारी विधानभवन परिसरात आंदोलन केले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावण्यापूर्वी कांद्याचा भाव प्रतिक्विंटल ४००० ते ४२०० रुपये होता. निर्यातबंदीनंतर कांद्याचा दर कमी होऊन १२०० ते १५०० रुपयांवर आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या निर्यातबंदीचा विरोध करावा, अन्यथा राज्य सरकारने कांद्याला चार हजार रुपये दर द्यावा. हेही वाचा : अकोला : युवती व महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले; अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून… कांद्याचा वांदा करणाऱ्या सरकारकचा धिक्कार असो यावेळी विरोधकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘कांद्याचा वांदा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘कांद्याची निर्यातबंदी हटवलीच पाहिजे’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘कांद्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘हल्लाबोल हल्लाबोल, मोदी सरकारवर हल्लाबोल,’ अशा घोषणा देत विरोधकांनी विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अनिल देशमुख, भास्कर जाधव, बंटी पाटील, विश्वजीत कदम, सचिन अहिर, प्रणिती शिंदे, रवींद्र धंगेकर, वर्षा गायकवाड, आदींचा सहभाग होता.