नागपूर : महिलेचा पती बेरोजगार आणि दारुडा. घरात सासू-सासरे आणि बारावीत असलेला मुलगा. मुलाला बारावीत शिकवणी वर्ग लावायचे आहेत, परंतु, पैसे नाहीत. घरात शिवणकाम करुन कमावणारी एकमेव महिला. त्यामुळे संसाराचा गाडा हाकताना आर्थिक अडचणींचा डोंगर समोर उभा होता. अशा स्थितीत एका मैत्रिणीकडे हातउसने पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर तिने लगेच झटपट पैसे कमविण्यासाठी एका आंबटशौकीन मित्राशी शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली. पैशांची चणचण लक्षात घेता विवाहित महिलेने होकार दिला. मुलाला बारावीची शिकवणीचा खर्च उचलता यावा म्हणून पुन्हा त्या मैत्रिणीकडे मदत मागायली गेली. मात्र, तिने वारंवार ग्राहकांकडे पाठवत तिला देहव्यापारात ढकलले. बुधवारी सायंकाळी खरबी चौकातील एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटमध्य ती विवाहित महिला पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि तिच्याकडून देहव्यापार करणाऱ्या पती-पत्नीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षीय विवाहित महिला अमरावतीची रहिवाशी असून तिला बाराव्या वर्गात शिकणारा मुलगा आहे. पती, वृद्ध सासू आणि सासऱ्यांसह ती राहते. पती दारुडा असून काहीही कामधंदा करीत नाही. ती महिला शिवणकाम करते. मात्र, तेवढ्या पैशात घरखर्च आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च झेपत नव्हता. त्यामुळे ती गेल्या वर्षभरापासून आर्थिक अडचणीत होती. ती पूजा ऊर्फ जानव्ही गोविंद भार्गव (३२, रा. फ्लॅट क्र. १०२, विशाखा अपार्टमेंट, खरबी चौक, वाठोडा) हिच्याशी ओळख झाली. महिलेने पूजाला आर्थिक मदत मागितली. तिने काही पैसे तिला दिला. मात्र, ती पैसे परत करु शकली नाही. त्यामुळे पूजाने तिला पैसे परत मागितले. पैसे नसल्याचे सांगताच पूजाने तिला ग्राहकासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास प्रतिग्राहक २ हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले. वाढता कर्जाचा डोंगर बघता महिलेने होकार दिला. पूजा आणि तिचा पती गोविंद या दोघांनी तिला देहव्यापारात ढकलले. तिला नेहमी आंबटशौकीन ग्राहकांकडे पाठवायला लागली.

पोलिसांच्या छाप्यात अडकली

आरोपी गोविंद आणि पूजा भार्गव हे दाम्पत्यांनी अमरावतीच्या विवाहित महिलेसह अन्य काही तरुणींना देहव्यापारात अडकवले आहे. ते विशाखा अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये आंबटशौकीन ग्राहकांना बोलावत होते. तसेच त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घ्यायचे. दरम्यान, बुधवारी सामाजिक सुरक्षा पथकाच्या प्रमुख कविता इसारकर यांना पूजा हिच्या घरातून चालणाऱ्या देहव्यवसायाची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी विशाखा अपार्टमेंटमध्ये छापा टाकला. येथे आरोपी दाम्पत्य हे एका महिलेकडून देहव्यवसाय करून घेताना सापडले. या महिलेला ताब्यात घेण्यात आले. कारवाईत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ३ दुरध्वनी, चार हजारांची रोकड तसेच इतर साहित्य असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी पूजा आणि गोविंद यांना वाठोडा पोलिसांच्या ताब्यात दिले.