नागपूर: जिल्ह्यातील जैवविविधता व राजभाज्या याचे आकर्षण निसर्गाशी जवळीकता साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असते. रानभाज्या या केवळ आहार आणि चवीशीच निगडीत नसून अनेक औषधी गुणतत्वे त्यामध्ये दडलेली असते. पिढ्यांपिढया पासून याच्या सेवनाला आपण अधिक महत्व देतो. सिमेंटच्या जंगलात आता मोकळी जागा नावालाच उरली आहे.शहरी नागरिकांना रानभाज्या उपलब्ध होणे तसे दुरापास्त. पण सरकार आता सर्वच गोष्टींमध्ये लक्ष घालू लागले आहे. रानभाज्यांची शहरी नागरिकांना उपलब्धता व्हावी म्हणूनही कृषी खात्याने त्यादिशेने एक पाऊल टाकले आहे.

नागपूरमध्ये नागरिकांना रानमेवा उपलब्ध व्हावा व शेतकरी गटांना यामाध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळावी याउद्देशाने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १२ व १३ ऑगस्ट असे दोन दिवस हा महोत्सव सिव्हिल लाईन्समधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तो होणार आहे. या महोत्सवासाठी २० स्टॉल्सची व्यवस्था केली जात असल्याची माहिती ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालिका डॉ. अर्चना कडू दिली.

हेही वाचा >>>Video: मुलांना पाठीवर बसवून पालकांचा जीवघेण्या पुलावरून…

नागपूर शहरालगतच्या गावखेड्यात शेतात उगवणाऱ्या रानभाज्या शहरात विक्रीसाठी आणणने तसे अवघड आणि खर्चिकही ठरते. शासकीय पाठबळाशिवाय हे शक्य नाही. त्यामुळेच कृषी खात्याच्या माध्यमातून दरवर्षी रानभाज्या उत्सव आयोजित केला जातो व नागपूरकर नागरिक त्याला उत्तम प्रतिसादही देतात. जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेले महिला बचत गट यात आर्वर्जून सहभागी होतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या खरेदीची पर्वणी नागपूरकरांना मिळते. एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या भाज्या मिळत असल्याने नागरिकांनाही इतर ठिकाणी जाण्याची गरज भासत नाही. सिव्हील लाईन्समध्ये अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्यात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची संख्याही बहुसंख्येने आहे. कार्यालयाची वेळ संपल्यावर त्या घरी परत जातांना रानभाजी महोत्सवाला भेट देऊ शकतात. त्यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात असते. त्यांनाही या महोत्सवाला भेट देऊन रानभाजी खरेदीचा आनंद घेता येऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त महिला व नागपूरकर नागरिकांनी महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्या रानभाज्या मिळणार

या रानभाजी महोत्सवात केना, कुंजरु, खापरखुटी, पाथरी, कपाळफोडी, टाकळा/तरोटा, मायाळू भाजी, कुरडुची भाजी, शेवळा, करटोली, काटेमाठ, हादगा, दिंडा भाजी, शेवगा, अघाडा, कमळून भाजी, आंबाडी भाजी, तसेच हंगामी फळे येथे ग्राहकांना मिळतील. जास्तीत जास्त नागपुरकरांनी याचा लाभ घेऊन शेतकरी गटांना अप्रत्यक्ष मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.