नागपूर : एकीकडे दिल्लीने तापमानाच्या पाऱ्याची पन्नाशी पार केली, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील विदर्भात देखील तापमानाच्या पाऱ्याची पन्नाशीकडे वाटचाल सुरू आहे. सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. माणसांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. वातानुकूलीत यंत्रणेचा पर्याय देखील या गर्मीपुढे नापास ठरला आहे. माणसांची जिथे हे हाल आहेत, तिथे जंगलातल्या प्राण्यांचे काय होत असेल?

शहराच्या तुलनेत जंगलात तापमान कमी असले तरी उन्हाचे चटके तेथेही असह्य होत आहे. मग प्राण्यांना पाण्यात डुंबून राहण्याशिवाय आणि पाणवठ्याजवळ बसून आराम करण्याशिवाय पर्याय नाही. ताडोबाच काय, पण सध्या सर्वच जंगलातील ही स्थिती आहे. वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी ताडोबा बफर क्षेत्रातील बेलाराची राणी ‘वीरा’चे पाणवठ्याजवळील वास्तव्य कॅमेऱ्यात कैद केले आहे.

हेही वाचा : बाप रे… बिहारच्या विद्यार्थ्याची नागपुरात आत्महत्या, खोलीतून कुजलेला वास आल्याने…

प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांसाठी वातानुकूलीत यंत्रणा लावण्यात येते, पण जंगलातल्या प्राण्यांसाठी ते करता येत नाही. वाघाला तर उन्हाचे चटकेच काय, पण उकाडा देखील सहन होत नाही. अशावेळी तो पाणवठ्याचा शोध घेत तेथेच मनसोक्त डुंबून राहतो. शरीरातील उष्णतेचा दाह थोडा कमी झाला की मग पाणवठ्याजवळच तो दुपारची वामकुक्षी घेतो. उन्हाळ्यात प्राण्यांसाठी सर्वच जंगलात नैसर्गिक पाणवठ्याच्या साफसफाईसोबतच कृत्रिम पाणवठेही तयार केले जातात. पूर्वी याच पाणवठ्यात टँकरने आणून टाकले जात होते. नंतर त्याठिकाणी बोरवेल करण्यात आल्या, पण मानवी हस्तक्षेपाशिवाय हे पाणवठे भरले जात नव्हते. आता मात्र सौर यंत्रणेचा वापर जंगलातील कृत्रिम पाणवठे भरण्यासाठी केला जात आहे. परिणामी मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे वन्यप्राणी तासनतास पाणवठ्यावर मुक्काम ठोकत आहेत.

वाघाची दहशतच एवढी की तो पाणवठ्यावर असेल तर इतर प्राणी तिकडे वळतही नाही. याचाच फायदा घेत वाघ अंगाचा दाह शांत होईपर्यंत पाण्यात बसून राहतो आणि बाहेर पडल्यावर पाणवठ्याजवळच वामकुक्षी घेतो. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बेलारा बफर क्षेत्रातील ‘वीरा’ने देखील बराचवेळ अंगाचा दाह शांत होईस्तोवर पाणवठ्यातच मुक्काम ठोकला. शांत झाल्यानंतर ही पाण्यातून बाहेर आली तेव्हा तिच्याच कुटुंबातील सदस्य त्याच पाणवठ्याजवळ वामकुक्षी घेत होते. बाहेर आल्यानंतर ‘वीरा’ने त्यांच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा तिने पाणवठ्याकडे आपला मोर्चा वळवला.

हेही वाचा : धक्कादायक..! बँकांची १४,५९५ कोटींनी फसवणूक, सर्वसामान्यांनी ठेवलेली रक्कम…

चिमूर तालुक्यातील पळसगाव बफरक्षेत्राअंतर्गत बेलारा गोंडमोहाडी-पळसगाव जंगलात पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या ‘वीरा’ नामक वाघिणीने मागील वर्षी याच काळात दोन बछड्यांना जन्म दिला. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांची संख्या मोठी आहे. बेलारा गोंडमोहाळी-पळसगाव जंगलात वाघांचा नेहमीच संचार असतो. याच जंगलात ‘वीरा’ नावाची वाघीण संचार करत असल्याचे अनेक पर्यटकांनी पाहिले. ती या भागात प्रख्यात आहे.