अकोला : अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी सीएच्या (सनदी लेखापाल) वर्षांत तीनवेळा परीक्षा घेण्याचा निर्णय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून २०४७ पर्यंत देशात ४० लाख सीए करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती आयसीएआयच्या सेन्ट्रल कौन्सिलचे सदस्य व ‘बोर्ड ऑफ स्टडीज’चे चेअरमन डॉ. राजकुमार अडुकिया यांनी दिली. ‘आयसीएआय’च्या अकोला भेटीप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अकाेला शाखेचे चेअरमन सुमित आलिमचंदानी, सचिव हिरेन जोगी व सीए रमेश चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. राजकुमार अडुकिया यांनी परीक्षा पद्धतीत झालेल्या बदलावर सविस्तर माहिती दिली. हेही वाचा - ‘एमपीएससी’ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, ‘यांना’ संवर्ग बदलण्याची संधी बारावीनंतर सीए होण्यासाठी ‘आयसीएआय’च्यावतीने सीए ‘फाउंडेशन’, सीए ‘इंटरमिजिएट’ व सीए अंतिम परीक्षा घेतली जाता. आतापर्यंत या तिन्ही परीक्षा वर्षांतून दोनवेळा घेतल्या जात होत्या. यावर्षीपासून सीए ‘फाउंडेशन’, सीए ‘इंटरमिजिएट’ या दोन परीक्षा वर्षांतून तीनवेळा घेतल्या जाणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळावी व तणावमुक्त होऊन त्यांनी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. सीए अंतिमची परीक्षा सध्या वर्षांतून दोनवेळाच होणार असून आगामी एक ते दोन वर्षांत ती परीक्षादेखील तीन वेळा घेतली जाईल, असे डॉ. राजकुमार अडुकिया यांनी सांगितले. सीए ‘फाउंडेशन’ची दरवर्षी सरासरी दीड लाख विद्यार्थी परीक्षा देतात. सीए ‘इंटरमिजिएट’साठी अडीच लाख परीक्षार्थी असतात. बारावीत शिकणारे विद्यार्थीदेखील नोंदणी करून सीए ‘फाउंडेशन’ची परीक्षा देऊ शकतील. मात्र, त्यांना मुदतीमध्ये बारावी उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार नवीन २० हजार सीए झाले आहेत, असे देखील डॉ. अडुकिया म्हणाले. हेही वाचा - दर महिन्याला ६ ते १० हजार विद्यावेतन, सरकारची आणखी एक योजना सीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बोर्ड ऑफ स्टडीज’ शैक्षणिक साहित्य निर्माण करीत असून अभ्यासक्रम तयार केला जातो. या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थी यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक साहित्यात वारंवार बदल करून अद्ययावत केला जात आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होत असल्याचेही डॉ. अडुकिया यांनी सांगितले. अकोल्यातील विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद सीए इंटरमिजिएटच्या परीक्षेमध्ये देशातील पहिल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये अकोल्यातील एकूण चार विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. अकोल्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद असल्याचे डॉ. राजकुमार अडुकिया म्हणाले. यावेळी देशातून दुसरा आलेला युग सचिन कारिया, ४५ वा क्रमांकावरील यश शैलेंद्र पाटील, ४७ वा यश मनोज देशमुख व ४८ वा पीयूष प्रवीणसिंग मोहता या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.