लोकसत्ता टीम यवतमाळ : वर्ल्डकप स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात अंदाज चुकल्याने नवख्या सट्टेबाजांना जबर आर्थिक फटका बसल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे. रविवारी भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची सर्वत्र उत्कंठा होती. भारत विजयी होणारच, असा विश्वास क्रिकेटप्रेमींत होता. त्यामुळे अंतिम सामन्यात सट्टाबाजारही गरम झाला. या एकाच दिवशी यवतमाळ जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या घरात सट्टा खेळला गेला. यात नेमण्यात आलेल्या ‘पंटर’च्या माध्यमातून बुकी मालामाल झाले, तर नवखे सट्टेबाज रस्त्यावर आले. ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धेपेक्षाही कमालीची उत्सुकता विश्वचषक स्पर्धेत बघावयास मिळाली. ही स्पर्धा देशातील विविध शहरात रंगल्याने बुकींना मोकळे रानच मिळाले. क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणार्यांची भावनिक मानसिकता ओळखून बुकींनी आपले खास ‘पंटर’ शहरी भागापासून ग्रामीणपर्यंत नेमले. त्यांच्याकडे मास्टर कार्ड देण्यात आले. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. अखेरच्या चेंडूपर्यंत काय होईल, याबाबत खेळाडूंसह क्रिकेटप्रेमींत धाकधूक बघावयास मिळाली. मैदानावर चालणार्या या खेळात बाहेर कोट्यवधींची उलाढाल झाली. लखपती होण्याच्या नादात जिल्ह्यातील अनेक जुगारी कर्जबाजारी झाल्याचे आता पुढे येत आहे. आणखी वाचा-बडनेरा-नाशिक दिवाळी विशेष मेमू नोव्हेंबर अखेरपर्यंत धावणार; प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे… गेल्या काही वर्षांपासून यवतमाळातील बुकी क्रिकेट सट्ट्याचे नेटवर्क हाताळत आहेत. हा गोरखधंदा पोलिसांच्या नजरेत आल्याने या अवैध व्यवसायाच्या प्रमुखांनी आपले बस्तान जिल्ह्यातून हलविले. विश्वचषक स्पर्धेत बुकींनी आपल्या नेमलेल्या खास पंटरमार्फत सट्टाबाजार चालविला. एका सामन्यावर लावला जाणारा सट्टा प्रत्येक बॉल, रन, सिक्सर, चौकार, सर्वाधिक धावा कोणता खेळाडू करणार, यावरही लावण्यात आला. यवतमाळ, वणी, पांढरकवडा या तालुक्यात एका दिवसात कोट्यवधींची उलाढाल झाली. कोट्यवधींचा मलिदा लाटण्यासाठी पहिल्या सामन्यापासून सक्रिय झालेले बुकींचे पंटर अखेरच्या सामान्यापर्यंत कायम राहिले. अंतिम सामन्यात भारत विश्वविजेता होणार, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींना होती. भावनिकतेच्या आहारी जाऊन नवख्या सट्टेबाजांनी टीम इंडियावर विश्वास दाखविला. मात्र भारताचा संघ प्रभावी खेळी करू शकला नाही. त्यामुळे सट्टेबाजारातही अनपेक्षित उलाढाल झाली. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक खेळीने नवख्या सट्टेबाजांचे स्वप्न भंगले. त्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता अनेकांनी गमावली. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या दीर्घ कालावधीत चाललेल्या क्रिकेट स्पर्धेत अनेकांचे दिवाळे निघाले. कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला जात असताना यवतमाळ, पांढरकवडा व वणी पोलिसांना एकही कारवाई करता आली नाही, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. आणखी वाचा-ऐन गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांची अडचण होणार; कारण काय…? ‘अॅप’च्या माध्यमातून खेळला गेला सट्टा भारत व पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला गेला. पोलिसांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी बुकींनी हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करून नवनवीन अॅप आणले. त्यावरच सट्टा खेळला गेला. मात्र या कालावधीत कुठेही पोलिसांची धडक कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.