नागपूर : वन्यप्राण्यांना त्रासदायक ठरतील अशा वस्तूंपासून व्याघ्रप्रकल्प मुक्त ठेवण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आधी प्लास्टिकच्या बाटल्यांशी वाघ खेळताना आढळून आला होता. आता त्याच व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाघाचा बछडा रस्त्याचे काम करणाऱ्या मजुराच्या ‘गमबुटा’शी खेळताना आढळला. प्रशासनाने प्लास्टिक व कचरामुक्त व्याघ्रप्रकल्प ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, पर्यटकांचा ओघ अधिक असलेल्या या व्याघ्रप्रकल्पात कधी प्लास्टिक बाटल्या तर कधी प्लास्टिकचे वेष्टण आढळतच आहेत. मे २०२३ मध्ये नवेगाव-अलीझंझा बफर क्षेत्रात ‘बबली’ या वाघिणीचे बछडे प्लास्टिकच्या बाटलीशी खेळताना दिसले होते. मुंबई येथील डॉक्टर राहुल महादार यांनी ही छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित केल्यानंतर खळबळ उडाली होती. डिसेंबर २०२० मध्ये ‘जुनाबाई’ वाघिणीचे बछडे प्लास्टिक पिशवीसोबत खेळताना आढळून आले. जानेवारी २०२१ मध्ये अलीझंझा बफर क्षेत्रात वाघिणीचा बछडा प्लास्टिक बाटली उचलतानाचे छायाचित्र समाजमाध्यमावर आले होते. बफर क्षेत्रात व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटकांचा ओढाही इकडेच आहे. बछडे मोठे होत असताना त्यांना कोणत्याही नव्या गोष्टींची उत्सुकता असते. अशावेळी बाटल्या किंवा तत्सम वस्तू त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. अलीकडच्या निदर्शनास आलेल्या घटना या वाघांच्या बछडय़ांबाबतच्याच आहे. हेही वाचा >>>वीज देयक कमी करण्याची मागणी अन्. महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण परिसरात रस्त्याचे काम सुरू निमढेला बफर क्षेत्रात ‘भानूसिखडी’ या वाघिणीचे सुमारे १५ महिन्यांचे तीन बछडे रबरी बुटांशी खेळताना वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार संदीप गुजर यांना दिसून आले. या क्षेत्रात पर्यटन व्यवस्थापन उत्तम असले तरीही रामदेगी मंदिर आणि बौद्ध स्तुप असल्याने गावातील लोक येथे येत असतात. रामदेगी मंदिराचे व्यवस्थापन पुरातत्त्व विभागाकडे असून बौद्धस्तुपाचे प्रकरण न्यायालयात आहे. परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने कदाचित त्यापैकीच एका मजुराचा ‘गमबूट’ राहिला असावा, अशी शंका आहे. ‘गमबूट’ वाहत आले असावे.. निमढेलाच्या आजूबाजूला सध्या रस्त्यांवर पाणी जाण्यासाठी रपटे तयार करण्यात आले आहेत. मजूर शक्यतोवर त्यांचे सामान घेऊन जातात आणि आम्हीही वन्यप्राण्यांना त्रासदायक ठरेल अशा वस्तू त्याठिकाणी नाही ना, हे तपासत असतो. दरम्यानच्या काळात हे काम सुरू असतानाच पाऊसही झाला. त्यावेळी ते वाहत आले असावेत, असे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे म्हणाले.