वर्धा : दत्ता मेघे यांचे विश्वासू पुतणे डॉ. उदय मेघे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने राजकीय भूकंप झाला आहे. त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत वर्धा क्षेत्रातून लढण्याची इच्छा व्यक्त करीत अर्ज सादर केला. तो अर्ज प्रदेश कार्यालयात देणे अपेक्षित होते. पण पटोले यांनी मेघे यांचा उमेदवारी अर्ज स्वतःच ठेवून घेतला.

यानंतर उदय मेघे हे संपर्क क्षेत्राबाहेर गेले. मात्र या घडामोडीवर सर्वप्रथम त्यांनी ‘लोकसत्ता’सोबत संवाद साधला. ते म्हणाले की माझ्या, वडिलांपासून वैचारिक निष्ठा ही समाजवादी राहिली. वडील प्राचार्य दिनकरराव मेघे स्मृती व्याख्यानमालेत आजवर जे वक्ते आले ते सर्व पुरोगामी विचाराचे होते. कट्टरतावादी एकही वक्त नव्हता. कुमार केतकर, पुण्यप्रसून वाजपेयी किंवा अन्य हे खुल्या व धर्मनिरपेक्ष विचाराचे होते. स्वतः साहेब (दत्ता मेघे) हे प्रत्येक कार्यक्रमास हजर राहिले. आज मी त्याच विचारावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : दत्ता मेघेंचे पुतणे काँग्रेसमध्ये दाखल; भाजपातील बड्या कुटुंबास खिंडार…

सागर किंवा दत्ता मेघे यांना ही भूमिका सांगितली का, या प्रश्नावर डॉ. उदय मेघे म्हणाले की, मी सागर मेघे यांना ही बाब सांगितली. तेव्हा त्यांनी वेगळे काही पाऊल टाकायचे असेल तर माझ्याशी किंवा संस्थेशी तुझा काहीच संबंध यापुढे राहणार नाही, असे निक्षुन सांगितले. ते मान्य करीत मी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दत्ता मेघे हे मला प्राणप्रिय राहिले व आहेत. त्यांची प्रकृती नीट नसल्याने त्यांच्याशी संवाद साधला नाही. परिस्थिती पाहून त्यांनीही निर्णय घेतले, हे मी आदर राखून सांगतो. मी भाजप सोडण्याचा किंवा काँग्रेस प्रवेशाचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे.

हेही वाचा : Bachchu Kadu: “मोर्चा अडवू नका, अन्‍यथा…”, बच्‍चू कडू यांचा इशारा

वर्धा विधानसभा तिकीट पक्की का, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, पक्ष निकष पाळण्याची सूचना झाली. त्यानुसार मी सोपस्कार पूर्ण केले. मला तिकीट द्यायची की नाही हे पक्षनेते राहुल गांधी ठरवतील. पण लढण्याची इच्छा मी व्यक्त करीत तसा अर्ज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुपूर्द केला आहे, अशी सविस्तर भूमिका डॉ. उदय मेघे यांनी ‘लोकसत्ता’कडे मांडली. पुन्हा मी सविस्तर बोलणार, असेही ते म्हणाले. ही घडामोड भाजपसाठी चांगलीच धक्कादायी ठरल्याचे आज दिसून आले.