लोकसत्ता टीम
वर्धा: आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचे वाटप केले जाणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी तसेच लोकांना कमी किमतीत तृणधान्य उपलब्ध व्हावे म्हणून उत्पादन क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय झाला. त्याअंतर्गत जिल्ह्यात १ लाख ७ हजार १६० धान्य बियाणे पिशव्यांचे मोफत वाटप होणार आहे. तसेच ‘क्रॉप कॅफेटेरीया’ अंतर्गत ३ हजार ७८ पिशव्या दिल्या जाणार आहे. यातील उत्पादित धान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वापरता येणार असून त्याच माध्यमातून बियाणे तयार करून पुढील वर्षासाठी त्याचा उपयोग घेता येणार आहे.
खरीप हंगामात तृणधान्यात सर्वाधिक वाटप ज्वारीच्या बियाण्याचे होणार आहे. तसेच बाजरी, राळा, कोदो, राजगीरा, नाचनी याचे बियाणे मिळतील. बदलत्या जीवनशैलीत ज्वारी, बाजरी, नाचनी व भगर ही तृणधान्ये जेवनात समाविष्ट होणे आवश्यक झाले आहे. हृद्यरोग, मधुमेह व पोटाच्या विकाराचे प्रमाण वाढले आहे.
हेही वाचा… वर्धा: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर, अभियंता होण्याची संधी, मिळणार खास प्रशिक्षण
गव्हाचा वापर वाढला. गव्हापासून तयार होणारा मैदा व मैद्यापासून तयार होणारे ब्रेड, बिस्किट, केक यांचा वापर वाढला आहे. या पदार्थापासून पोटात तयार होणारा चिकटा हा रक्तवाहिण्यांमध्ये साठून विविध विकार उद्भवतात. या पार्श्वभूमीवर डॉक्टरसुद्धा तृणधान्याचा आहारात वापर करण्याची शिफारस करू लागले आहे. या धान्याचे लागवड क्षेत्र कमी झाल्याने ती वाढण्यासाठी बियाणे मोफत दिल्या जात असल्याचे कृषी अधिक्षक प्रभाकर शिवणकर यांनी नमूद केले. याच माध्यमातून तृणधान्याचे बियाणे घरीच तयार करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार असल्याने त्यांनी लाभ घेणे अपेक्षित असल्याचे शिवणकर म्हणाले.