यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव येथे सराफा दुकान गॅस कटरने फोडून मुद्देमालासह चोरटे पसार झाले. ही घटना बुधवारी उघडकीस आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात या गुन्ह्यचा उलगडा करीत तीन चोरट्यांना जेरबंद केले. नाजीम उर्फ बाबू खान असलम खान (२२), समीर खान हसन खान (२७) (दोघे रा, डोर्लीरोड, यवतमाळ), सोहेल शाह रफीक शाह (२२, रा. आदर्श नगर, यवतमाळ) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. हेही वाचा : यवतमाळ : परजिल्ह्यातून चोरल्या १० लाखांच्या दुचाकी राळेगावातील अनुपचंद वर्मा यांचे सराफा लाइनमध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सडपातळ बांध्याच्या तीन चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून हे दुकान फोडले. आठ लाख ९४ हजार ३५० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून एका मालवाहू वाहनाने पळ काढला. याप्रकरणी अनूपचंद वर्मा यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून चोरट्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तिघांना ताब्यात घेतले, चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेले वाहन, दुचाकी, तीन मोबाईल, गॅस कटर, सिलिंडर व चोरी गेलेले सोन्या-चांदीचे संपूर्ण दागिने असा एकूण ११ लाख ६६ हजार ३५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास राळेगाव पोलीस करत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, ठाणेदार रामकृष्ण जाधव, सपोनि अमोल मुडे, पीएसआय धनराज हाके आदींनी केली.