यवतमाळ : शहरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. घराला कुलूप दिसले की त्या घरी चोरी होणारच, एवढी दहशत सध्या चोरट्यांनी शहरात निर्माण केली. येथील अवधूतवाडी पोलिसांनी सराईत चोरट्यांच्या दहशतीचा बीमोड करत टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल आठ गुन्हे उघडकीस आणले. सोबतच साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

रामेश्वर उर्फ गोल्या जोमीवाडे (२१) रा. एकलव्य नगर, रेशम गेडाम (२४) रा. दारव्हा रोड, अविनाश उर्फ डोमा लंगोटे (२६) रा. मोठे वडगाव, आकाश लंगोटे (२०) रा. मोठे वडगाव आणि वंश लंगोटे (२०) रा. नाकापार्डी ता. यवतमाळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच सराईत चोरट्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी व घरफोडीच्या अनेक घटना घडल्या होत्या. या घटनांचा उलगडा करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी अवधुतवाडी ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले. त्यावरून चोरट्यांची शोधमोहीम राबवित पोलिसांनी एका पाठोपाठ एक पाच सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू केली. या चोरट्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच त्यांनी तब्बल आठ गुन्ह्यांची कबुली दिली.

हेही वाचा : ६० वर्षांच्या संसारानंतर पती-पत्नीने एकत्रितपणे घेतला जगातून निरोप

यामध्ये अवधुतवाडीतील सात तर लोहारा ठाण्यातील एका गुन्ह्याचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन दुचाकी, लॅपटॉप, सोन्या-चांदीचे दागिने, १९ मोबाईल, दोन कॅमेरे, पाण्याची मोटार, रोख रक्कमेसह इतर साहित्य असा एकूण चार लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अवधुतवाडीचे ठाणेदार नरेश रणधीर, सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण भाकडे, राहित चौधरी, गजानन वाटमोडे, पथकातील विशाल भगत, गजानन दूधकोहळे, आशीष भुसारी, सुरेश मेश्राम, रवी खांदवे, बलराम शुक्ला, रूपेश ढोबळे, कमलेश भोयर, सागर चिरडे, रशीद शेख, सागर राऊत, रूपाली धोंगडे, चालक राजन कुरकुटे, गणेश राठोड, महेश मांगुळकर आदींनी पार पाडली.