यवतमाळ : राळेगाव येथील प्रचारसभेदरम्यान मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर अज्ञात इसमाने दगड भिरकावला. ही घटना आज सायंकाळी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान घडली.

राळेगाव येथे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारसभेचे आयोजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या सभेसाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे राळेगाव येथे आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंचावर येण्यापूर्वी उदय सामंत यांचा ताफा सभास्थळी पोहोचला.

हेही वाचा…“देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय,” राळेगाव येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मंत्री सामंत हे मंचावर विराजमान झाल्यानंतर सभा मंडपाबाहेर त्यांच्या वाहनांचा ताफा होता. या ताफ्यातील एका वाहनावर अज्ञात व्यक्तीने दगड भिरकावला. या घटनेत वाहनाची काच फुटली. यामुळे सभास्थळी काही काळ गोंधळ उडाला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा व्यक्ती कोण, हे कळले नाही. सभास्थळी या घटनेची चांगली चर्चा रंगली होती.