यवतमाळ : जिल्ह्यात सर्वत्र चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच गेल्या काही महिन्यांपासून तोतया पोलिसांच्या थापांना नागरिक बळी पडत आहेत. तोतया पोलीस महिला, वयोवृद्ध नागरिकांना थापा देवून अंगावरील दागिने काढायला लावतात आणि हातचलाखीने रिकामी पुडी देत दागिने घेवून पळ काढतात. असाच प्रकार रविवारी सकाळी शहरातील सत्यसाईज्योत मंगल कार्यालय परिसरात घडला.

विनायक केशवराव टोपरे (८४) रा. सरस्वतीनगर वडगाव रोड हे एका मेडिकलमधून औषधी घेवून दुचाकीने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवून दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. समोर तपासणी सुरू आहे, आम्ही पोलीस आहोत. तुमच्या जवळील सोन्याची अंगठी व साखळी आमच्याकडे द्या, त्याची पुडी बांधून खिशात ठेवा, असे सांगितले, याला टोपरे यांनी नकार दिला. त्यांचा विश्वास पटण्यासाठी मागून आलेल्या एका व्यक्तीला त्या दोघांनी थांबवून त्यांच्याकडील दागिने मागितले. त्या दागिन्यांची पुडी बांधून संबंधिताकडे परत केली. हा प्रकार पाहून टोपरे यांचा विश्वास बसला. त्यांनीसुद्धा बोटातील अंगठी व गळ्यातील गोफ कादून त्या तोतयांकडे दिला.

हेही वाचा…अकोला : वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचे वाढते संकट, तीन महिन्यात ५२ बळी

हातचलाखीने तोतयांनी रिकामी पुडी टोपरे यांच्या हातात दिली व तेथून पोबारा केला. टोपरे यांनी पुडी उघडली असता त्यात दागिने दिसले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. चोरट्यांनी एक लाख ३७ हजारांचे १९ ग्राम सोन्याचे दागिने उडविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटीव्ही तपासले, मात्र त्यातून काहीही हाती लागले नाही.

दुसऱ्या घटनेने नेर शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला. एकाच दिवशी चार ठिकाणी चोऱ्या करून लाखो रुपयांच मुद्देमाल लंपास केला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पॅथोलॉजिस्ट यांच्यासह इतर दोन ठिकाणी ही घरफोडी झाली. यवतमाळ येथून श्वानपथकाला तपासासाठी आणले, मात्र चोरट्यांचा माग लागला नाही.

हेही वाचा…नागपूर : वाठोडा परिसरात एका सदनिकेत देहव्यापार, दोन तरुणींची सुटका तर दोघींना अटक

नेर येथील मातोश्री नगरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सरदार हे सकाळी ६ वाजता सहकुटुंब लग्नाला गेले होते. सायंकाळी घरी परत आले तेव्हा त्यांना दाराचे कुलूप फोडले असल्याचे दिसून आले घरातील कपाटात ठेवून असलेले साहित्य बाहेर पडून होते. कपाटात ठेवून असलेले रोख ५६ हजार रुपये व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केले. बहीरम नगरात पॅथोलॉजिस्ट अजय राठोड व त्यांच्या पत्नी हे दोघेही लॅबमध्ये गेले होते. घरी आले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडले असल्याचे लक्षात आले. घरातील कपाट फोडल्याचे दिसले. चोरट्यांनी कपाटातून २४ ग्राम वजनाची एक लाख ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, रोख ५० हजार रुपये लंपास केले. याच दिवशी शारदानगर परिसरातही दोन चोऱ्या झाल्या. ठाकरे व जाधव यांच्या घरी ही चोरी झाली.

हेही वाचा…वाशीम : मानोऱ्यात जोरदार पाऊस; नागरिकांची उकाड्यापासून सुटका

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. परंतु, काहीच हाती लागले नाही. भरदिवसा झालेल्या या चोऱ्यांमुळे नागरिकांत दहशत पसरली आहे. ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.