महेश बोकडे नागपूर : राज्यात सर्वाधिक वीज निर्मितीचा दावा करणाऱ्या महानिर्मिती या शासकीय कंपनीला गरजेच्या तुलनेत वर्षांला कमी कोळशाचा पुरवठा होतो. कंपनीला २०२१- २२ या आर्थिक वर्षांच्या तुलनेत २०२२- २३ मध्ये जास्त कोळसा मिळाला. परंतु, महानिर्मितीच्या वार्षिक गरजेहून तो कमी होता.राज्याच्या बऱ्याच भागात तापमान वाढल्याने शनिवारी दुपारी ३ वाजता विजेची मागणी २८ हजार ‘मेगावॅट’च्या जवळपास गेली होती. त्यापैकी १० हजार ३४५ ‘मेगावॅट’ वीज केंद्राच्या वाटय़ातून राज्याला मिळत होती. तर ८ हजार १३७ ‘मेगावॅट’ वीज महानिर्मितीकडून मिळत होती. महानिर्मितीकडून ६ हजार १०८ ‘मेगावॅट’ वीज औष्णिक वीज केंद्रातून तर उर्वरित वीज गॅस, जलविद्युत, सौरऊर्जेतून निर्माण केली जात होती. दरम्यान, महानिर्मितीला राज्यभऱ्यातील औष्णिक विद्युत केंद्रासाठी वर्षांला ५५.३२ दशलक्ष मेट्रिक टन कोळशाची गरज आहे. परंतु, २०२१- २२ या वर्षी महानिर्मितीला फक्त ३८.७२ दशलक्ष मेट्रिक टन (७० टक्के) कोळसा प्राप्त झाला. २०२२- २३ मध्ये महानिर्मितीला गेल्या वर्षीहून जास्त ४५.२६ दशलक्ष मेट्रिक टन (८२ टक्के) कोळसा प्राप्त झाला. परंतु, वार्षिक गरजेच्या तुलनेत तो कमी होता. तर ३१ मे २०२२ रोजी राज्यात महानिर्मितीकडे ०.७६१ मेट्रिक टन कोळशाचा साठा होता. हा साठा ३१ मे २०२३ रोजी १.४७ दशलक्ष मेट्रिक टन नोंदवला गेला. त्यामुळे साठय़ामध्ये दुप्पट वाढ झालेली दिसत आहे. पावसाळय़ाच्या तोंडावर नियोजन वेस्टन कोल्ड फिल्ड लि. ने जास्तीत जास्त कच्चा कोळसा देऊ केल्याने महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर केंद्रापर्यंत वाहतूकदारांमार्फत रस्ता मार्गाने कोळसा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. साठा वाढवण्यासाठी ‘वॉशरीज’मधून धुतलेला कोळसा कोराडी, खापरखेडा, चंद्रपूरला वाहून नेला जात आहे. वेकोली, एसईसीएल, एमसीएल या कोल कंपन्यांच्या खाण क्षेत्रातून विविध विद्युत प्रकल्पापर्यंत रस्ता आणि रेल्वेद्वारे कोळसा वाहतूक सुरू आहे. ऊर्जामंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार यंदा कोळशाचे योग्य नियोजन केल्याने कोळशाचा साठा गेल्या वर्षांपेक्षा दुप्पट आहे. पावसाळय़ात कोळशाची टंचाई पडू नये म्हणून ‘वेकोली’कडून जास्त कोळसा मिळवला जात आहे. ‘एससीसीएल’ सोबत ६ दशलक्ष मेट्रिक टन कोळशाचा टप्प्या- टप्प्याने तीन वर्षेपर्यंत पुरवठा करण्याबाबत सामंजस्य करारही केला आहे. - राजेश पाटील, प्रभारी संचालक, (खनिकर्म), महानिर्मिती, मुंबई.