नागपूर : विषबुद्धी बुद्धिजीवी हिंदू समाज तोडताहेत ! ; माजी खासदार तरुण विजय यांची टीका

ज्यांनी हा देश तोडला त्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येतो तर ज्यांनी देश जोडण्याचे काम केले त्यांना मात्र अभ्यासक्रमाबाहेर ठेवण्यात येते.

innogration
( प्रतिनिधिक छायाचित्र )

नागपुरात समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन
ज्यांनी हा देश तोडला त्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येतो तर ज्यांनी देश जोडण्याचे काम केले त्यांना मात्र अभ्यासक्रमाबाहेर ठेवण्यात येते. हिंदू समाजाला जातीच्या आधारावर तोडण्याचे काम विषबुद्धी असलेले हे बुद्धिजीवी करीत आहेत, अशी टीका माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार तरुण विजय यांनी केली.

नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात समरसता साहित्य परिषद महाराष्ट्रतर्फे आयोजित १९ व्या समरसता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, माजी संमेलनाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, परिषदेचे अध्यक्ष ईश्वर नंदापुरे उपस्थित होते.

तरुण विजय पुढे म्हणाले, ज्यांनी देशात समरसता निर्माण करुन देश जोडण्याचे काम केले असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले हे पाठ्यपुस्तकाच्या बाहेर आहेत आणि बाबर, जहागीर, औरंगजेब आणि त्यांच्या वंशजाचा उल्लेख पाठ्यपुस्तकात आहे. सामाजिक समरसता ही राजकीय क्षेत्रातून नाही तर साहित्यिकांच्या लेखनीतून निर्माण होऊ शकते. त्या दृष्टीने अशा साहित्य संंमेलनातून या विषयावर चिंतन होण्याची गरज आहे.

अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला जागृत करणारे अग्निस्फुल्लिंग आहेत. आपल्या दु:ख आणि वेदनेला त्यांनी कधीही विषात रुपांतरित होऊ दिले नाही. भेदभावाची व्यवस्था हाडामांसाच्या माणसाला माणसापासून जातीच्या कारणास्तव दूर ठेवते. उच्च-नीच हे जन्मावरुन नव्हे तर व्यवहारावरुन ठरावे, असे विजय म्हणाले. राष्ट्रात आणि समाजान निर्माण होणारे भेद दूर करण्याचे काम या संमेलनातून होत असल्याचेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Inauguration of samarasata sahitya sammelan in nagpur amy

Next Story
मुनगंटीवार यांच्या मदतीमुळे नचिकेत होणार डॉक्टर ; वैद्यकिय शिक्षणासाठी ‘सीएसआर’द्वारे ७.५० लाखांची मदत
फोटो गॅलरी