नामांकित बांधकाम व्यावसायिकांवर छापे

कोटय़वधींच्या व्यवहारात करचोरी होत असल्याची माहिती आयकर अन्वेषण विभागाला होती.

नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या घरी व कार्यालयावर आयकर अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकले

आयकर अन्वेषण विभागाची कारवाई; कोटय़वधींचा गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता

नागपूर : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता व करचोरी प्रकरणी शहरातील सहा नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या घरी व कार्यालयावर आयकर अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकले. ही कारवाई आज मंगळवारी भल्या पहाटे करण्यात आली. या व्यावसायिकांच्या नागपूरसोबतच यवतमाळ आणि चंद्रपूरच्याही प्रतिष्ठानावर छापे टाकण्यात आले. या कारवाईत सर्व बँक खाते, लॉकर्स आणि महत्त्वाची कागदपत्रे विभागाने जप्त केली.

बांधकाम क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात अवैध पशांची गुंतवणूक सर्वश्रूत आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात करचोरी होत असल्याचे यापूर्वी अनेक प्रकरणातून सिद्ध झाले आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील सहा नामांकित बांधकाम व्यावसायिक अतुल यमसनवार, प्रशांत बोंगिरवार, राहुल उपगन्लवार, विश्वास चकनलवार, सुधीर कुणावार आणि चंद्रकांत पद्मावार यांच्या घरी व प्रतिष्ठानावर छापे टाकण्यात आले. अतुल यमसनवार हे ऑरेंज सिटी हाऊसिंग फायनान्स लि.चे मुख्य कार्यकारी आधिकारी आहेत, तर याच कंपनीत विश्वास चकनलवार सहव्यवस्थापकीय संचालक आहेत. चंद्रकांत पद्मावर हे मंगलम् बिल्डर्स डेव्हलपर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रशांत बोंगिरवार मेट्रो सिटी होम्सचे संचालक आहेत. राहुल उपगन्लवार तिरुपती रियालिटीचे संचालक आहेत. तसेच सुधीर कुणावार माँ महालक्ष्मीचे संचालक आहेत. या व्यावसायिकांचा व्यवहार संशायस्पद असून त्यांचे तार एकमेकांशी जुळले असल्याचे समोर आले आहे. कोटय़वधींच्या व्यवहारात करचोरी होत असल्याची माहिती आयकर अन्वेषण विभागाला होती. त्या आधारावर आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. या बांधकाम व्यावसायिकांसोबतच या गैरव्यवहारात अजून दहा ते पंधरा बांधकाम व्यावसायिक गुंतले असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यासोबतही मोठे व्यवहार झाले असल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे. या व्यावसायिकांच्या कार्यालयातील संगणकातील व्यवहाराची माहिती व महत्त्वाची कागपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये अनेक नावे समोर येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. अलीकडच्या काळातील ही  सर्वात मोठी कारवाई असून या प्रकरणात दोनशे आयकर अधिकारी तपास करीत आहेत. ही मोठी कारवाई असल्याने  शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Income tax department raid in office residences of nagpur top builders zws

ताज्या बातम्या