scorecardresearch

भांडेवाडी परिसरातील हवा प्रदूषणात वाढ

  भांडेवाडी क्षेपणभूमी मोठय़ा प्रमाणात हवा प्रदूषित करत असून परिसरातील नागरिक २४ तास घातक हवेच्या वातावरणात राहत असल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांपेक्षा अतिसूक्ष्म धूलिकण घनता दुप्पट; ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’च्या अभ्यासातील निरीक्षण

नागपूर :  भांडेवाडी क्षेपणभूमी मोठय़ा प्रमाणात हवा प्रदूषित करत असून परिसरातील नागरिक २४ तास घातक हवेच्या वातावरणात राहत असल्याचे समोर आले आहे. ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ने केलेल्या हवा गुणवत्तेच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. ‘एअर क्वालिटी मॉनिटिरग नागपूर’ या  अभ्यासात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखून दिलेल्या राष्ट्रीय सुरक्षा मानकांपेक्षा अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम २.५) घनता या भागात दुप्पट प्रमाणात आढळून आली. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या सुधारित मानकांपेक्षा हे प्रमाण आठपट अधिक  आहे. अतिसूक्ष्म धूलिकणांचा (पीएम २.५) आकार मानवी केसांपेक्षा ३० पट लहान असतो. मानवी फुफ्फुसात पोहोचण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे अनेक आजार तसेच समस्या निर्माण होतात.

अतिसूक्ष्म धूलिकणाच्या उच्च पातळीमुळे कमी दृश्यमानता आणि धूरकट वातावरण निर्माण होते. नागपूर शहरातील एकमेव सतत सभेावतालची हवा गुणवत्ता निरीक्षण स्थानक हे या ठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. भांडेवाडीतून निघणाऱ्या धुरामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांना श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. या भागात हवा गुणवत्ता निरीक्षण स्थानक नसल्याने दोन महिन्यासाठी याठिकाणी हवेच्या गुणवत्ता निरीक्षणाचा प्रयोग करण्यात आला. भांडेवाडी प्रवेशद्वार आणि दीड किलोमीटरवरील वैष्णोदेवी लेआऊट येथे बसवलेल्या दोन निरीक्षणांमधून काही नोंदी प्राप्त झाल्या आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २४ तासांसाठी ६० मायक्रॉन प्रति घनमीटर असे अतिसूक्ष्म धूलिकणाचे प्रमाण निर्धारित केले असताना या परिसरात चार डिसेंबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ यादरम्यान अतिसूक्ष्म धूलिकणांची सरासरी घनता ११५.६३ मायक्रॉन प्रति घनमीटर आढळून आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या १५ मायक्रॉन प्रति घनमीटर या निर्धारित मानकापेक्षा सरासरी नोंदी या ७.७ पट अधिक आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने भांडेवाडीपासून दहा किलोमीटरवर सिव्हिल लाईन्स येथे उभारलेल्या निरीक्षण स्थानकाची आकडेवारीची तुलना केली तर याच कालावधीत तेथील अतिसूक्ष्म धूलिकणाचे प्रमाण ४३.४८ मायक्रॉन प्रति घनमीटर नोंदवण्यात आले. अतिसूक्ष्म धूलिकणांच्या विश्लेषणाचे मूल्यांकन ‘असर’च्या पर्यावरण संशोधक आणि ‘कम्युनिकेशन िथक टँक’च्या साक्षी राजभोग यांनी स्वतंत्रपणे केले आहे. शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर सुमारे ७७ एकरवर कचराभूमी विस्तारली आहे. यापैकी ५२ एकर जागा कचरा टाकण्यासाठी आणि २५ एकर जागा सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरली जाते. या परिसरातील अनेकांनी राहती घरे विकून या जागेला कायमचा रामराम ठोकण्याचा प्रयत्न केला, पण कचराभूमीमुळे येथे घर विकत घेण्यास कुणीही तयार नाहीत, हे येथे उल्लेखनीय.

पावसाळय़ात कचरा कुजण्यामुळे येणाऱ्या दरुगधीने घरात बसणे कठीण होते.  उन्हाळा आणि हिवाळय़ात कचरा जाळल्याने होणाऱ्या धुरामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. खोकला, श्वसनाच्या आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे – ज्योती वाघमारे, वैष्णोदेवी नगर ले आऊट

भांडेवाडीत हवा प्रदूषणाची समस्या सातत्याने दिसून येते. स्थानिक नागरिक तसेच पुढील पिढीचे आरोग्य आणि सुरक्षा त्यामुळे धोक्यात आली आहे.  आतील भागात कचरा जाळण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात दिसत आहेत.’’ – लीना बुद्धे, संस्थापक, ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’

हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांमुळे लहान मुले आणि प्रौढांनाही अल्प आणि दीर्घकालीन आजाराचा सामना करावा लागतो. यात फुफ्फुसाचे कार्य कमी होणे, श्वसनासंबंधी संसर्ग आणि दमा वाढणे याचा समावेश आहे. कमी वजनाचे बाळ, मुदतपूर्व प्रसूती आणि लहान गर्भावस्थेतील जन्म असेही दुष्परिणाम समोर येत आहेत. – डॉ. समीर अरबट, इंटव्‍‌र्हेन्शनल पल्मोनोलॉजिस्ट

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Increase air pollution bhande wadi areaparticulate dust density doubles central pollution control board standards observations center sustainable development study amy