नागपूर : करोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेदरम्यान देशात ‘डिजिटल’ व्यवहारात वाढ नोंदवण्यात आली. २०२० मध्ये ३,९४९ सेवांसाठी ७,२०३ कोटींचे डिजिटल व्यवहार झाले होते तर २०२१ मध्ये ४,०२० सेवांसाठी १० हजार ४४३ कोटींच्या ई व्यवहाराची नोंद केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या पोर्टलवर करण्यात आली. महाराष्ट्रात २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये दुपटीने वाढ नोंदवण्यात आली.
‘ई-ताल प्लॅटफॉर्म’ ही ई -व्यवहारांची नोंद ठेवणारी केंद्र सरकारची यंत्रणा आहे. त्यावरील २०२०-२०२१ या करोना काळातील ई व्यवहाराच्या देशभरातील नोंदीवर नजर टाकल्यास वरील बाब स्पष्ट होते. २०२१ या वर्षांत ४,०२० सेवांसाठी १० हजार ४४३ कोटींचे ई व्यवहार करण्यात आले तर २०२० या वर्षांत ३,९४९ सेवांसाठी ७,२०३ कोटींच्या ई-व्यवहारांची नोंद झाली. महाराष्ट्राचा विचार करता २०१९ मध्ये ही संख्या २५.१९ कोटी, २०२० मध्ये १६.८१ कोटी आणि २०२१ मध्ये ४१.८५ कोटीं इतकी होती. महाराष्ट्रात करोनाच्या पहिल्या लाटेत ई-व्यवहाराच्या संख्येत घट दिसून येते. त्यापूर्वीच्या वर्षांत ही संख्या २५.१६ कोटी होती. करोनाच्या पहिल्या लाटेत कठोर टाळेबंदी होती, लोकंही घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे अ़ॉनलाईन व्यवहारालाच पसंती दिली जात होती. दुसऱ्या लाटेदरम्यान करोनाबाबत अधिक स्पष्टता आली. लस घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले, काही अंशी बाजारपेठा सुरू होत्या. तरीही लोक बाहेर पडणे, गर्दीत न जाणे पसंत करीत असल्याने या काळात पहिल्या लाटेच्या तुलनेत डिजिटल व्यवहाराची संख्या वाढली, असे बँकांचे अधिकारी सांगतात.
महाराष्ट्रातील स्थिती
वर्ष व्यवहारांची संख्या (कोटीत)
२०१९ २५ .१९
२०२० १६.८१
२०२१ ४१.८५