नागपूर : महाराष्ट्रात मानव-वाघ, बिबट संघर्षांचा आलेख उंचावत असतानाच भारतातील काही राज्यात मानव-हत्ती संघर्षही वाढल्याचे पुढे आले आहे. विविध उपाययोजनांसह अथक प्रयत्न करूनही हा संघर्ष कमी होण्याऐवजी टिपेला पोहोचला आहे.
भारतात मानव-हत्ती संघर्षांमध्ये २०१५-२०१८ या कालावधीत दोन हजार ३८१ माणसे आणि ४९० हत्ती तर २०१८-२०२० या कालावधीत एक हजार ४०१ माणसे आणि ३०१ हत्ती मृत्युमुखी पडलेत. मानव-हत्ती संघर्षांवरील प्राथमिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. भारतात सुमारे २७ हजार आशियाई हत्ती आहेत. मानवी लोकसंख्येत होणारी वाढ आणि विकासामुळे हत्तीच्या अधिवासात होणारा बदल मानव-हत्ती संघर्षांसाठी कारणीभूत आहे. या संघर्षांचे परिणाम मानव आणि हत्तींसाठी धोकादायक ठरत आहेत. २००० ते २०१० दरम्यान हत्तींनी शेतातील उभे पीक नष्ट केल्यामुळे ०.५ दशलक्ष कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले, असे मानव-हत्ती संघर्ष नावाच्या प्राथमिक अहवालात नमूद आहे. सर्वाधिक हत्ती असलेल्या १४ राज्यांमध्ये आतापर्यंत सुमारे ३० हत्ती राखीव क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. आर्थिक आणि पायाभूत विकासामुळे हत्तीच्या अधिवासाचे तुकडे होणे, अधिवास नाहीसा होणे, पीक पद्धतीत बदल होणे, अशा काही कारणांमुळे मानव-हत्ती संघर्ष वाढत चालला आहे. हत्तींचे कळप मानवी वर्चस्व असलेल्या भागात शिरतात. अलीकडेच छत्तीसगडमार्गे सुमारे २२ ते २४ हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात शिरला. हे हत्ती काही महिने तिथेच वास्तव्यास होते.
क्षेत्रीय मार्गदर्शिका प्रकाशित
हत्तींचा अधिवास असलेल्या तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, बंगाल, आसाम आणि उत्तराखंड राज्यात मानव-हत्ती संघर्ष हाताळणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी क्षेत्रीय मार्गदर्शिका प्रकाशित केली. याव्यतिरिक्त त्यांनी मानव-हत्ती संघर्षांवरील प्राथमिक अहवाल आणि ट्रम्पेट नावाच्या पुस्तकाचे प्रकाशनही केले. भारतीय वन्यजीव संस्था आणि वन्यजीवांसाठी जागतिक निधीसोबत मिळून ही मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे.