लोकसत्ता टीम नागपूर : केंद्रीय दळनवळनमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरात मागील सात वर्षांची तुलना केल्यास यंदा अपघाताच्या तुलनेत मृत्यूंचे प्रमाण खूपच वाढल्याची धक्कादायक माहिती आहे. २०२४ मध्ये सहा महिन्यातच नागपूर शहर हद्दीत अपघाती मृत्यूचे शतक नोंदवले गेले असून प्रत्येक १०० अपघातामागे ३२ जण दगावल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेल्या नागपूर शहरात २०१८ मध्ये ३६८ अपघातात ७० नागरिकांचा मृत्यू झाला तर ३६४ जण जखमी झाले. शहरातील अपघाताच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १९.०२ टक्के होते. २०१९ मध्ये ४४० अपघातात ११४ मृत्यू झाले व ४४४ जण जखमी झाले. मृत्यूचे प्रमाण २५.९० टक्के होते. २०२० मध्ये ३१८ अपघातामध्ये ८१ मृत्यू तर २९७ जण जखमी झाले. मृत्यूचे प्रमाण २५.४७ टक्के होते. २०२१ मध्ये ३९४ अपघातात ११८ मृत्यू झाले, ३६२ जखमी झाले. मृत्यूचे प्रमाण २९.९४ टक्के होते. आणखी वाचा-बच्चू कडूंच्या मोर्चासाठी महिलांची दिशाभूल; सहलीसाठी नेत असल्याचे… वर्ष २०२२ मध्ये ५२७ अपघातात १४५ मृत्यू तर ५३३ जण जखमी झाले. या वर्षात मृत्यूचे प्रमाण २७.५१ टक्के होते. २०२३ मध्ये ६०४ अपघातात १५१ मृत्यू तर ५९७ जण जखमी झाले. मृत्यूचे प्रमाण २५ टक्के होते. यंदा १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यात ३३७ अपघातात ११० जणांचा मृत्यू झाला, तर २९३ जण जखमी झाले. मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे तब्बल ३२.६४ टक्के नोंदवण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलाकर यांच्या अर्जावर पोलीस निरीक्षक अपघात शाखेचे सतीश फरकाळे यांनी ही माहिती दिली. शहरात यंदा प्रत्येक १०० अपघातामागे ३२ जणांचा मृत्यू होत झाल्याने अपघातावर नियंत्रणासाठी नागपूर शहर पोलिसांसह जिल्हा रस्ता सुरक्षा समिती काय उपाय करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आणखी वाचा-राष्ट्रवादी नेता पुत्राचे ट्वीट, ‘धन्यवाद, सुधीरभाऊ…’ गंभीर जखमींची संख्या जास्त नागपूर शहरात १ जानेवारी ते ३० जून २०२४ दरम्यान सहा महिन्यात १०९ अपघात झाले. त्यात ११० जणांचा मृत्यू झाला तर १९ जण गंभीर जखमी झाले. गंभीर संवर्गातील १५१ अपघातात १८४ जण गंभीर जखमी झाले. गैरगंभीर संवर्गातील ७७ अपघातात ९० जण किरकोळ जखमी झाल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे. दगावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक पुरूष नागपूर शहरात १ जानेवारी ते ३० जून २०२४ दरम्यान सहा महिन्यात अपघातानंतर दगावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक पुरूषांचा समावेश आहे. शहरात १०९ अपघातात ११० मृत्यू झाले. त्यात ९६ पुरूष तर १४ महिलांचा समावेश आहे.