नागपूर : गेल्या चार वर्षांमध्ये पती-पत्नीमध्ये घटस्फोट होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत घटस्फोटाची १२ हजार ६७९ प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात दाखल झाली. यामधील १२ हजार ३४२ दाम्पत्यांनी घटस्फोट घेतला. यामध्ये लग्न झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात सहमतीने नाते तुटलेल्या दाम्पत्यांचा सर्वाधिक समावेश आहे, ही धक्कादायक माहिती कौटुंबिक न्यायालय विभागातून समोर आली.

मोठमोठ्या शहरांतील उच्चशिक्षित दाम्पत्यांची संख्या जास्त असून अनेकांना संयुक्त कुटुंब पद्धतीला तिटकारा आहे. तसेच अत्यंत व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांच्या आयुष्यात विविध प्रकारचे तणाव निर्माण होत आहेत. नोकरदार पती किंवा पत्नीला वेळ कमी मिळत असल्याने नात्यांना वेळ देणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. लग्न झाल्यावर सुखी संसार थाटण्याची स्वप्ने रंगविणाऱ्या दाम्पत्याच्या चेहऱ्यांवरील रंग वर्षभरात उडायला लागतात. एकमेकांकडून लग्नापूर्वी केलेले अपेक्षा, आश्वासन पूर्ण होत नसल्यामुळे संसारात कटुता निर्माण होत आहे. लग्नाच्या काही दिवसांनंतरच संयुक्त कुटुंबाऐवजी एकल कुटुंबात राहण्याचा हट्ट करण्यात येतो किंवा पत्नीच्या माहेरच्या मंडळींचा संसारात सर्वाधिक हस्तक्षेप असणे हेसुद्धा महत्वाचे कारण कुटुंब व्यवस्थेला खिळ बसण्याचे मानल्या जात आहे. स्वार्थीवृत्ती आणि स्वच्छंद जीवन जगण्याची पद्धतीमुळेसुद्धा सुखी संसाराला ग्रहण लागत असल्याचे काही प्रकार समोर आले आहे. त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून शहरात घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२४ मध्ये २६९२ घटस्फोटाचे प्रकरणी न्यायालयात दाखल झाली. त्यापैकी २४७० प्रकरणांमध्ये घटस्फोट मंजूर करण्यात आला. तर जानेवारी ते मार्च २०२५ या तीन महिन्यांत तब्बल १९५३ दाम्पत्यांना घटस्फोट मंजूर करण्यात आला. न्यायालयात दाखल १२६७९ प्रकरणांपैकी १२३४२ प्रकरणांमध्ये न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे, अशी माहिती अभय कोलारकर यांना माहिती अधिकारातून मिळाली आहे.

सहमतीने घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या जास्त

संसारात कोणत्याही कारणाने आलेल्या वितृष्टामुळे लगेच घटस्फोटाचा निर्णय घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपापल्या जीवनशैलीनुसार जगण्याची चढाओढ असल्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. त्यातही पती आणि पत्नीमध्ये सामंजस्याने घटस्फोट घेणाऱ्यांचीही संख्या जास्त आहे. गेल्या चार वर्षांत ४ हजार ९६४ दाम्पत्यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेऊन नव्याने संसार सुरु केला.

प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंध

वैवाहिक जिवनात अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, प्रेमप्रकरणासह पद आणि पैशाची गुर्मी, अभिमान, कुटुंबियांचा अतिहस्तक्षेप यामुळे सर्वाधिक संसारात विघ्न निर्माण झाले आहेत. संसार तुटण्यांच्या कारणांमध्ये याचासुद्धा समावेश आहे. समूपदेशन केल्यानंतरही घटस्फोटाच्या प्रकरणात वाढ होत असल्याची माहिती आकडेवारीवरुन समोर आली आहे.