समाजमाध्यमांवरून वादग्रस्त मजकूर हटवण्याच्या प्रमाणात वाढ ; कोल्हे हत्या प्रकरणानंतर वापरकर्ते भीतीच्या छायेखाली

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ अनेकांनी समाजमाध्यमांवर संदेश प्रसारित केले होते.

Social Media
( प्रतिनिधिक छायाचित्र )

नागपूर : भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ अनेकांनी समाजमाध्यमांवर संदेश प्रसारित केले होते. परंतु, उदयपूर आणि अमरावती येथील हत्या प्रकरणांनंतर अनेकांनी वादग्रस्त मजकूर हटवल्याचे निदर्शनास आले आहे.

नागपुरात दोन युवकांना वादग्रस्त मजकूर ‘डिलीट’ करण्यासाठी एका टोळक्याने ठार मारण्याची धमकी दिली होती. मात्र, नागपूर पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. अनेकजणांनी भीतीपोटी समाजमाध्यमांवरील आपल्या वादग्रस्त ‘पोस्ट’ हटवल्या आहेत.

नंदनवन परिसरातील एका २२ वर्षीय युवकाने नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओ प्रसारित केले होते. त्यावर काही युवकांनी त्याचे घर शोधून काढले आणि त्याला कुटुंबीयांसह ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. त्याच्या छायाचित्रावर लाल रंगाने फुली मारून समाजमाध्यमावर टाकण्यात आले. त्यामुळे तो युवक १५ दिवसांपूर्वी शहर सोडून गेला आहे. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. काही युवकांना ताब्यातही घेतल्याची माहिती समोर येत आहे.

लकडगंजमध्ये गुन्हा

लकडगंजमधील २१ वर्षांच्या तरुणाने नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर संदेश प्रसारित केले होते. त्यावर अनेक टिपण्याही आल्या होत्या. त्यानंतर काही युवकांनी त्याला धमकी दिली. त्यामुळे त्याने लगेच लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी काही युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली.

अकोल्यात एकाला मारहाण?

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर ‘स्टेट्स’ ठेवल्याने अकोल्यातील एका व्यावसायिकाला मारहाण केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकऱ्यांना निवेदन सादर करून राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे, मात्र मारहाण झाल्याचे आढळले नसल्याचे शहर कोतवाली पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तीन ते चार युवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Increased rate of deleting controversial text from social media nupur sharma amy

Next Story
अन्नसुरक्षा केवळ १८० अधिकाऱ्यांच्या खांद्यावर ; अनधिकृत विक्रेत्यांवरील कारवाईवर मर्यादा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी