नागपूर : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या आपल्या कारकिर्दीतील कठीण टप्प्यातून जात आहे. सातत्याने अपयशी ठरत असलेला फॉर्म, वाढता दबाव आणि टी-२० वर्ल्ड कप २०२६च्या पार्श्वभूमीवर निवडकर्त्यांची चिंता या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आता सूर्यकुमार आहे.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) जामठा स्टेडियमवर येत्या २१ जानेवारी रोजी होणाऱ्या आगामी सामन्यांमधून तो पुन्हा ‘मिस्टर ३६०’ म्हणून ओळख मिळवू शकतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आकडेवारी पाहता, २०२५ हे वर्ष सूर्यकुमारसाठी अत्यंत निराशाजनक ठरले आहे. या वर्षात त्याने खेळलेल्या २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ १९ धावा प्रति डाव अशी सरासरी नोंदवली असून, एकूण धावसंख्या १२३ इतकीच आहे. स्ट्राइक रेट समाधानकारक असला तरी सातत्याचा अभाव स्पष्टपणे जाणवतो.
२०२४ मध्ये ज्या प्रकारे त्याने धावांचा पाऊस पाडला होता, त्याच्या तुलनेत सध्याची कामगिरी निवडकर्त्यांसाठी चिंताजनक आहे. नागपूरमध्ये सामन्यासाठी भारतीय संघाचे काही खेळाडू शनिवार,१७ जानेवारीलाच नागपूरमध्ये आले. रविवार,१८ जानेवारीला सकाळी भारतीय खेळाडूंंनी सरावही केला. यात सूर्यकुमार यादव यानेही पुन्हा फॉर्म परत मिळविण्यासाठी कसून सराव केला.
संधी की अखेरचा इशारा?
भारतीय संघाच्या मधल्या फळीत सध्या मोठे बदल होत आहेत. काही वरिष्ठ खेळाडू दुखापतीमुळे किंवा विश्रांतीवर असल्याने सूर्यकुमारला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. मात्र, ही संधीच त्याच्यासाठी अखेरचा इशारा ठरू शकते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. जामठा स्टेडियमवरील सामने हे त्याच्या पुनरागमनाचे व्यासपीठ ठरतील की, टी-२० वर्ल्ड कप २०२६पूर्वी त्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, हे त्याच्या कामगिरीवरच अवलंबून आहे.
नागपूरशी जुने नाते
नागपूरचा सूर्यकुमारशी खास संबंध आहे. याच शहरात त्याने यापूर्वी महत्त्वाच्या सामन्यांत दमदार खेळी केली आहे. त्यामुळे घरच्या मैदानाचा फायदा घेत तो पुन्हा आत्मविश्वासाने खेळेल, अशी अपेक्षा संघ व्यवस्थापनाला आहे. सूर्यकुमार केवळ फटकेबाज नाही, तर भारतीय टी-२० संघाच्या आक्रमक ओळखीचा चेहरा आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ प्रतिमा नव्हे, तर कामगिरी बोलते. जामठ्यातील सामने हेच ठरवतील की सूर्यकुमार यादवचा हरवलेला ‘तेज’ पुन्हा चमकणार की, भारतीय संघाला भविष्यासाठी नवे पर्याय शोधावे लागणार.
