नागपूर : अमेरिका-इस्रायल आणि इराणदरम्यान युद्ध सुरू असताना द्रवीकृत नैसर्गिक वायूच्या (एलएनजी) पुरवठ्यावर ताण निर्माण झाला होता. तरीही जून २०२६मध्ये देशातील वायूआधारित वीज प्रकल्पांना ४७.४२ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन वायू उपलब्ध झाला. त्यात ३६.७८ दशलक्ष घनमीटर देशांतर्गत आणि १०.६४ दशलक्ष घनमीटर द्रवस्वरूपात आयात करून पुन्हा वायूकरण केलेला वायू आहे. केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या इंधन व्यवस्थापन विभागाच्या जून २०२६च्या मासिक अहवालात ही माहिती आहे.
देशातील वायूआधारित वीज प्रकल्पांमध्ये वीजनिर्मितीसाठी नैसर्गिक वायू वापरला जातो. आयात करताना नैसर्गिक वायू द्रवरूपात आणला जातो. भारतात त्याचे पुन्हा वायुरूपात रूपांतर करून तो वीज प्रकल्पांना पुरवला जातो. अहवालात देशांतर्गत वायू, आयात केलेला दीर्घकालीन वायू, आयात केल्यानंतर पुनर्वायूकरण केलेला वायू आणि केजीडी-६ वायू अशा विविध स्रोतांची स्वतंत्र नोंद आहे.
राज्यातील वीज प्रकल्पांची वीजनिर्मिती
१. रत्नागिरी प्रकल्प
– या प्रकल्पाची क्षमता १,९६७.०८ मेगावॅट असून जूनमध्ये ९०.९१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. या प्रकल्पाला ८.५० दशलक्ष घनमीटर प्रतिदिन वायूचे वाटप, तर ०.६४ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन वायूचा वापर झाला.
२. उरण प्रकल्प
– या प्रकल्पाची क्षमता ६७२ मेगावॅट असून जूनमध्ये १९५.९७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. या प्रकल्पाला ३.५० दशलक्ष घनमीटर प्रतिदिन वायूचे वाटप, तर १.५८ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन वायूचा वापर झाला.
३. ट्रॉम्बे प्रकल्प
– ट्रॉम्बे प्रकल्पाची क्षमता १८० मेगावॅट असून जूनमध्ये १०४.२४ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. या प्रकल्पाला १.५० दशलक्ष घनमीटर प्रतिदिन वायूचे वाटप, तर ०.७७ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन वायूचा वापर झाला.
महानिर्मिती प्रशासन आणि शासनाच्या समन्वयातून उरण प्रकल्पाला कठीण काळातही गॅसचा पुरवठा होऊन चांगली वीजनिर्मिती झाली. केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या अहवालातून ते स्पष्ट झाले. – अभय हरणे, संचालक (संचलन), महानिर्मिती, मुंबई</p>
जूनमधील स्थिती
– देशातील वायूआधारित वीज प्रकल्पांची स्थापित क्षमता १९,६४२.८४ मेगावॅट
– वायू वाहिनीशी जोडलेल्या प्रकल्पांची क्षमता १६,९४७.३० मेगावॅट
– स्वतंत्र वायू क्षेत्रांशी जोडलेल्या प्रकल्पांची क्षमता २,६९५.५४ मेगावॅट
– वायू वाहिनीशी जोडलेल्या प्रकल्पांना प्रतिदिन ३५.०४ दशलक्ष घनमीटर वायूचे वाटप
– स्वतंत्र वायू क्षेत्रांशी जोडलेल्या प्रकल्पांना १२.३८ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन देशांतर्गत वायूचे वाटप
