नागपूर : भारतात २०१८ पर्यंत रेडिओ कॉलर केलेल्या वाघांची संख्या ५९ इतकी होती. गेल्या तीन ते चार वर्षांत ती किती झाली, याची अधिकृत माहिती अद्यापपर्यंत समोर आली नाही. मात्र, रेडिओ कॉलरच्या माध्यमातून वाघांच्या स्थलांतरणाचा आलेख तयार होत असतानाच कॉलर केलेले काही वाघ बेपत्तादेखील झाले आहेत. त्यामुळे रेडिओ कॉलरच्या पूर्ण क्षमतेच्या वापरावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

 वाघांचे स्थलांतरण यापूर्वीही होत होते, पण रेडिओ कॉलरसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हे स्थलांतरण समोर येत आहे. त्यातूनच वाघांचे कॉरिडॉर आणि वाघांचे संरक्षण व संवर्धनाविषयी वनखात्याकडून योग्य पावले उचलली जात आहेत. मात्र, त्याच वेळी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संशोधनाची गरजदेखील व्यक्त होत आहे. कारण वाघांचे स्थलांतरण समोर आल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न कायम आहे. नागझिरा अभयारण्यातून उमरेड-करांडला अभयारण्यात पोहोचलेल्या ‘जय’ या वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. पहिली रेडिओ कॉलर गळाल्यानंतर दुसरी लावण्यात आली. मात्र, १८ एप्रिल २०१६ नंतर त्या वाघाचा काहीच पत्ता लागला नाही. खात्याने तसेच त्याला कॉलर करणाऱ्या शास्त्रज्ञांनी शेवटपर्यंत तो जिवंत असल्याचे सांगत वेळ मारून नेली. त्यानंतर टिपेश्वर अभयारण्यातून अजिंठा, मराठवाडा असा सुमारे ३२०० किलोमीटरचा प्रवास करत ज्ञानगंगा अभयारण्य गाठले. मात्र, गेल्या काही महिन्यांत या वाघाचादेखील ठावठिकाणा नाही. त्यानंतर याच अभयारण्यातून एक वाघ गौताळा अभयारण्यात पोहोचला. त्याचाही आता ठावठिकाणा नाही. मध्यप्रदेशातून सातपुडय़ात आलेल्या एका वाघाची रेडिओ कॉलर घट्ट झाल्याचे समोर आले आहे, पण त्यावरही अजूनपर्यंत काहीच झाले नाही. अत्याधुनिक रेडिओ कॉलरमुळे कॉलर केलेल्या वाघाची क्षणाक्षणाची माहिती मिळते. कॉलर बंद झाली असेल, गळून पडली असेल तरीही माहिती होते. वाघांचे स्थलांतरण ही संवेदनशील व महत्त्वाची बाब असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. रेडिओ कॉलरमुळे वाघाचे स्थलांतरण व कॉरिडॉर सुरक्षा करता येत असली तरीही त्यावर आणखी संशोधन होण्याची गरज वन्यजीव अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

किंमत तीन ते पाच लाख रुपयापर्यंत

जीपीएस, अ‍ॅक्टिव्हीटी सेन्सर, मॉर्टेलिटी सेंसर, व्हीएचएफ, यूएचएफ, ऑटोमॅटिक ड्रॉप ऑप या तंत्राचा समावेश असणाऱ्या अत्याधुनिक रेडिओ कॉलरच्या किमती तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत आहेत.

वाघांचे स्थलांतर ही अतिशय संवेदनशील व महत्त्वाची बाब आहे. एक वनक्षेत्रातून वाघ दुसऱ्या वनक्षेत्रांत स्थलांतर करतांना कॉलर आयडी व अनुषंगिक संशोधन हे अति उपयुक्त आहे. अनेक वाघांचे मार्गक्रमण व स्थलांतर यातून आपल्याला माहीत झाले आहे. याची संपूर्ण व प्रभावी अंमलबजावणी झाल्यास वाघांच्या संवर्धनासाठी झटणारे वनरक्षक व वन विभागाच्या यंत्रणेला लाभ होईल.

यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक