नागपूर: भारताच्या सागरी व्यापाराने गेल्या दोन वर्षांत मोठी झेप घेतली असून देशातील १२ प्रमुख बंदरांमधून होणारी मालवाहतूक तब्बल ९५.४४ दशलक्ष टनांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. २०२३-२४ मध्ये ८१९.२९ दशलक्ष टन असलेली मालवाहतूक २०२५-२६ मध्ये ९१४.७३ दशलक्ष टनांवर पोहोचली आहे. म्हणजेच अवघ्या दोन वर्षांत ११.६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या या आकडेवारीवरून देशातील आयात-निर्यात व्यवहारांना वेग मिळत असल्याचे आणि प्रमुख बंदरांची क्षमता वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

केंद्र सरकारच्या बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या परिवहन संशोधन विभागाने माहिती अधिकारांतर्गत नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते संजय थुल यांना ही माहिती दिली. त्यानुसार, २०२३-२४ मध्ये प्रमुख बंदरांमधून ८१९.२९ दशलक्ष टन मालाची हाताळणी झाली होती. त्यावेळी वार्षिक वाढीचा दर ४.४६ टक्के होता. त्यानंतर २०२४-२५ मध्ये मालवाहतूक वाढून ८५४.८६ दशलक्ष टनांवर पोहोचली. २०२५-२६ या वर्षात हा आकडा थेट ९१४.७३ दशलक्ष टनांवर गेला. विशेष म्हणजे २०२४-२५ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये मालवाहतुकीत जवळपास ६० दशलक्ष टनांची वाढ झाली आहे. तर २०२३- २४ यावर्षीच्या तुलनेत २०२५-२६ या वर्षात मालवाहतूक ९५.४४ दशलक्ष टनांनी वाढली आहे. यावरून देशातील आयात-निर्यात व्यवहारांना गती मिळाल्याचे तसेच बंदरांच्या क्षमतेत वाढ झाल्याचे संकेत मिळत आहेत.

माल चढवणे-उतरणे आणि रवाना करण्याचा वेळ वाढला

जहाजांना बंदरात येऊन माल चढवणे-उतरणे आणि पुन्हा रवाना होण्यासाठी लागणारा सरासरी कालावधी २०२३-२४ मध्ये ५२.८२ तास होता. तो २०२४-२५ मध्ये वाढून ५८.२८ तासांवर गेला. तसेच एका धक्क्यावर दिवसाला हाताळल्या जाणाऱ्या मालाचे प्रमाण २३,५७० टनांवरून २२,३२६ टनांपर्यंत घसरल्याचे आकडे सांगतात. २०२५-२६ या वर्षासाठी जहाजांच्या वळणकालावधी आणि धक्का उत्पादकतेची अंतिम आकडेवारी अद्याप संकलनाधीन असल्याचे मंत्रालयाने माहिती अधिकारातील उत्तरात स्पष्ट केले आहे.

देशातील १२ प्रमुख बंदरे

देशातील प्रमुख बंदरांमध्ये दीनदयाळ बंदर, कांडला (गुजरात), मुंबई बंदर (महाराष्ट्र), जवाहरलाल नेहरू बंदर, न्हावा शेवा (महाराष्ट्र), मुरगाव बंदर (गोवा), न्यू मंगळुरू बंदर (कर्नाटक), कोची बंदर (केरळ), चेन्नई बंदर (तामिळनाडू), कामराजर बंदर, एन्नोर (तामिळनाडू), व्ही. ओ. चिदंबरनार बंदर, तूतीकोरिन (तामिळनाडू), विशाखापट्टणम बंदर (आंध्र प्रदेश), पारादीप बंदर (ओडिशा), श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर, कोलकाता-हल्दिया (पश्चिम बंगाल) या बंदरांचा समावेश आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार २०२५-२६ या वर्षात या बंदरांनी एकत्रितपणे सुमारे ९१४.७३ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली आहे. देशाच्या सागरी व्यापारातील ही आतापर्यंतची सर्वाधिक प्रभावी कामगिरी आहे.

दोन वर्षांत किती वाढ?

२०२३-२४ : ८१९.२९ दशलक्ष टन मालवाहतूक
२०२५-२६ : ९१४.७३ दशलक्ष टन मालवाहतूक
एकूण वाढ : ९५.४४ दशलक्ष टन
वाढीचे प्रमाण : ११.६ टक्के