अकोला: भारत-अमेरिका व्यापार करारामुळे कृषी क्षेत्रावर गंभीर परिणामाचा धोका निर्माण झाला आहे, असा सूर शेतकरी अर्थ परिषदेत उमटला. शेतकऱ्यांनी एकजूट होण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील बाभुळगाव येथील महात्मा फुले आयुर्वेदिक महाविद्यालयात काँग्रेसच्यावतीने शेतकरी अर्थ परिषदेचे आयोजन आमदार साजिद खान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

कृषी व ग्रामीण अर्थ व्यवस्थेचे अभ्यासक मिलिंद मुरुगकर, काँग्रेसचे केंद्रीय सचिव कुणाल चौधरी, किसन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पास्ते, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, काँग्रेस नेते प्रकाश तायडे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, शहराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे, मनपा विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसेन, माजी आमदार बबनराव चौधरी, प्रदेश काँग्रेस सचिव ॲड. महेश गणगणे, प्रवक्ते कपिल ढोके, महिला जिल्हाध्यक्ष पूजा काळे, प्रदेश सचिव प्रशांत पाचडे आदींची उपस्थिती होती. या अर्थ परिषदेमध्ये भारत-अमेरिका व्यापार करार, त्याचा परिणाम, शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी यावर मंथन करण्यात आले.

शेतकरी विविध संकटाने भरडला जात असताना भारत-अमेरिका व्यापार करारामुळे शेती व्यवसाय, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार आहेत, असे मत मिलिंद मुरुगकर यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्यासाठी शेती व शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल, असे पराग पास्ते म्हणाले. देशाच्या सीमेवर जवान आणि शेतात शेतकरी मरत आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे धोरण असल्याचा आरोप कुणाल चौधरी यांनी केला. शेतकऱ्यांची आत्महत्या नोंद सरकार करू देत नाही. कारण सत्य आकडेवारी समोर येऊ शकते. देशातील शेतकऱ्यांवर सरकारचे कर्ज नाही तर आपल्या शेतकऱ्यांचे सरकारवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे. शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याचे प्रकाश पोहरे यांनी सांगितले.

शेतकरी कष्टकऱ्यांच्या विरोधातील सत्तेला प्रश्न विचारत राहू, असे आमदार पठाण म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मानकर यांनी केले. सूत्रसंचालन काँग्रेस ज्येष्ठ नेते अविनाश देशमुख यांनी केले. यावेळी शेतकरी, महिला व तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

…तर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील

शेतकऱ्यांची चळवळ येणाऱ्या पिढीसाठी असून एकदिलाने एकजूट होण्याची आवश्यकता आहे. या लढ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.