नागपूर : भारत आणि न्यूझिलँड संघादरम्यान २१ जानेवारीला जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर टी- २० चा सामना रंगणार आहे. या निमित्त देश- विदेशातील खेळाडू आणि समर्थक नागपुरात दाखल झाले आहेत. सामन्या दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानासह ‘ए-आय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून करडी नजर ठेवली जाणार आहे.

गर्दीच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित गर्दी व्यवस्थापन प्रकल्पातून संशयितांच्या हालचालींचे स्कॅनिंग केले जाईल. पोलीस आयुक्तालयाने अलीकडेच नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशन आणि धम्म दीक्षा सोहळ्यात क्लिक २ क्लाउड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत धोरणात्मक भागीदार केली होती. त्याच धर्तीवर मायक्रोसॉफ्ट तंत्रज्ञान सहाय्याने हा वॉच ठेवला जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात दिली.

पोलीस उपायुक्त मतानी म्हणाले, ए. आय. निरीक्षक नावाने प्रगत संगणक दृष्टी, एआय व्हिडिओ अॅनालिटिक्स, हीट मॅपिंग आणि वास्तविक वेळेतील देखरेख प्रणालीचा वापर करून गर्दीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल. संभाव्य गर्दीचे विश्लेषित करून ही प्रणाली जोखीम निर्माण होताच पोलिसांना सूचना पाठवेल. संवेदनशील क्षेत्रात संशयित व्यक्ती दिसताच हालचालींचे लक्ष ठेवले जाईल. ही प्रणाली मायक्रोसॉफ्ट अझ्युर, क्लिक २ क्लाउड अथवा एआय इंजिन, तसेच सीसीटीव्ही सारख्या डिजिटल सर्व्हिलन्स नेटवर्कच्या एकत्रित तंत्रज्ञानावर आधारित असेल. गर्दीच्या ठिकाणाचे व्यवस्थापन केल्यानंतर सुरक्षा मनुष्यबळाला अलर्ट दिला जाणार आहे.

६० एकरावर मोफत वाहनतळ

सामन्या दरम्यान होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता वाहनतळासाठी ६० एकर जागा निश्चित झाली आहे. तिकीटानुसार ए टू जी पर्यंत वाहनतळ असतील. दुचाकी आणि चारचाकींसाठी स्वतंत्र वाहनतळ असेल. शाळेच्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ असेल. वाहनतळ संपूर्णपणे मोफत असून कुठेही पैसे आकारले जाणार नाहीत.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निवडा हे मार्ग

वर्धा, बुटीबोरी मार्गाने जामठ्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी कक्ष-एफ (ब्रह्मकुमारी) निश्चित झाला आहे. येथे एका बाजुला दुचाकी तर दुसऱ्या बाजुला चार चाकी वाहन तळ असेल. तेथून मैदानासाठी फिडर बसची असेल. जामठा टी पॉईंटवरून कोणताही प्रवेश नाही. या मार्गाने फक्त खेळाडूंची वाहने जातील. त्याचप्रमाणे शाळेच्या वाहनांना एनसीआयच्या समोरून वळण घ्यावे लागेल. गेट नंबर १३ समोर उपलब्ध पार्किगच्या कक्षात वाहने पार्क करावी लागतील. व्हिसीएच्या सदस्यांची वाहने देखील याच पद्धतीने प्रवेश घेतील.