नागपूर : विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी मिळून भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय विजय घडवले, विश्वचषकातील अनेक विक्रम रचले आणि भारतीय फलंदाजीला जागतिक स्तरावर नवी उंची दिली. टी-२० सामन्यांमध्ये कोहली आणि रोहित यांची फलंदाजी बघण्यासाठी क्रिकेटचे चाहते आतुर राहतात. नागपूरमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलँड संघादरम्यान पहिला टी-२० सामना २१ जानेवारी रोजी खेळविला जात आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ टी-२० विश्वचषकापूर्वीच्या मालिकेची विजयी सुरूवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळत नसले तरी त्यांची अप्रत्यक्ष उपस्थिती स्टेडियममध्ये बघायला मिळत आहे.

निवृत्तीनंतरही मैदानात कसे?

विराट कोहलीने १२ जून २०१० रोजी झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे आपला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सुरुवातीला तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या कोहलीने पुढे टी-२० फॉरमॅटमध्ये सातत्य, दबावाखाली धावा काढण्याची क्षमता आणि मोठ्या सामन्यांतील कामगिरी यांमुळे वेगळी ओळख निर्माण केली. त्याने १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ४,१८८ धावा केल्या असून त्यात १ शतक व ३८ अर्धशतके आहेत. टी-२० विश्वचषक २०१४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलेला कोहली २०१६ च्या विश्वचषकातही ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला.

२०२४ च्या अंतिम सामन्यात त्याने ७६ धावांची संयमी पण निर्णायक खेळी साकारत ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळवला आणि त्यानंतर “टी-२० आंतरराष्ट्रीयसाठी ही माझी शेवटची खेळी आहे,” अशी भावनिक घोषणा केली. दुसरीकडे, रोहित शर्माने १९ सप्टेंबर २००७ रोजी इंग्लंडविरुद्ध डरबन येथे झालेल्या उद्घाटन टी-२० विश्वचषकात आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला. कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच निर्भय फलंदाजी ही त्याची ओळख राहिली. ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक पाच शतकांचा विक्रम आहे.

त्याने १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ४,२३१ धावा केल्या असून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अग्रस्थानी राहिला आहे. कर्णधार म्हणून त्याने भारतीय संघाला २०२४ च्या टी-२० विश्वचषकात एकही सामना न हरता विजेतेपद मिळवून दिले. अंतिम सामन्यानंतर रोहितनेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत, पुढील पिढीला संधी देण्याची वेळ आल्याचे नमूद केले.

निवृत्तीमुळे दोन्ही खेळाडू नागपूर टी-२० सामन्यात प्रत्यक्ष खेळत नसले तरी त्यांच्या नावाच्या टी शर्ट स्टेडियममध्ये दूरवर बघायला मिळत आहेत. स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही रोहित आणि विराटच्या नावाच्या टी-शर्टना सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र बघायला मिळाले. १८ क्रमांकाची कोहलीची टी-शर्ट तर ४५ क्रमांकाची रोहित शर्माची टी-शर्ट नागपूरच्या सामन्यात लक्षवेधी ठरत आहे.