नागपूर : गिधाडांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरलेल्या औषधांवर बंदी घालून दोन दशके उलटली. तरीही देशातील गिधाडांची संख्या पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत नाहीत. ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स’च्या (SoIB) २०२५ मधील अद्ययावत आकडेवारीतून गिधाडांच्या संख्येतील घटता कल कायम असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केवळ औषधांवरील बंदी पुरेशी ठरली का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
औषधांपलीकडेही धोके
गिधाडांसमोरील संकट केवळ औषधांपुरते मर्यादित राहिलेले नाही. चुकीच्या पद्धतीने उभारलेले विद्युत खांब आणि वीजवाहिन्यांमुळे होणारा विजेचा धक्का, पवनचक्क्या व वीजवाहिन्यांशी होणारी धडक, तसेच मृत जनावरांच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांमुळे होणारी स्पर्धा आणि व्यत्यय यामुळेही गिधाडांना धोका निर्माण झाला आहे. विषबाधेमुळे मृत झालेल्या जनावरांचे मांस खाल्ल्याने गिधाडांना होणारी दुय्यम विषबाधा हीदेखील गंभीर समस्या आहे. एप्रिल २०२६ मध्ये दुधवा व्याघ्र प्रकल्पात विषबाधेमुळे मृत झालेल्या कुत्र्यांचे शव खाल्ल्यानंतर २५ हून अधिक हिमालयीन गिधाडांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गिधाडांसाठी विषबाधेचा धोका पुन्हा अधोरेखित झाला.
नेपाळमधील सकारात्मक कल महत्त्वाचा
‘सेव्हिंग एशियाज व्हल्चर्स फ्रॉम एक्स्टिंक्शन’ (SAVE)चे सल्लागार ख्रिस बोडेन यांनी भारतातील ई-बर्डच्या आकडेवारीतून दिसणारा गिधाडांच्या संख्येतील घटता कल चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. भारताच्या तुलनेत शेजारील नेपाळमध्ये विषारी NSAID औषधे अधिक प्रभावीपणे हटवण्यात आल्यानंतर गिधाडांच्या संख्येत सकारात्मक कल दिसत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भारतात २००६ मध्ये पशुवैद्यकीय डायक्लोफेनॅकवर बंदी घालणे हे गिधाडांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल होते. मात्र, औषधांची सुरक्षा तपासणी, बंदीची अंमलबजावणी आणि देशव्यापी निरीक्षण अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
संवर्धनासाठी सातत्याने निरीक्षण गरजेचे
गिधाडे ही दीर्घायुषी आणि संथ प्रजनन करणारी पक्षीप्रजाती असल्याने संवर्धनाच्या उपाययोजनांचा परिणाम दिसण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. त्यामुळे देशभरातील गिधाडांच्या संख्येचे सातत्याने निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS)कडून देशभरात गिधाडांचे सर्वेक्षण, वसाहतींचे निरीक्षण आणि पुनर्प्रस्थापनेचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच WWF-India कडून राज्य वन विभागांच्या सहकार्याने गिधाडांची घरटी आणि वसाहतींचे निरीक्षण, उपग्रह टॅगिंग आणि विजेच्या तारांमुळे होणारा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. गिधाडांचे संवर्धन केवळ एका प्रजातीचे रक्षण करण्यापुरते मर्यादित नसून, मृत प्राण्यांचे विघटन करून पर्यावरणातील जैविक स्वच्छता राखण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे औषधांवरील बंदीबरोबरच तिची कठोर अंमलबजावणी, विषबाधा रोखणे आणि अधिवासातील इतर धोके कमी करणे आवश्यक आहे.
