IMD weather forecast May 2026 : नागपूर : देशात मे २०२६ महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, त्याचवेळी काही भागात उष्णतेच्या लाटाही अधिक तीव्र होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिला आहे. विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, पूर्व किनारपट्टी आणि हिमालयाच्या पायथ्याच्या भागात उष्णतेच्या लाटांचे दिवस वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मे महिन्याचा अंदाज काय

देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्य ते कमी राहण्याचा अंदाज असला, तरी दक्षिण भारत, ईशान्य आणि वायव्य भारतातील काही भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते. किमान तापमान मात्र बहुतांश ठिकाणी सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या बाबतीत, देशभरात सरासरीपेक्षा (१०० टक्क्यांहून अधिक) पाऊस अपेक्षित आहे. बहुतांश भागात सामान्य ते जास्त पाऊस होईल; मात्र पूर्व, ईशान्य आणि पूर्व-मध्य भारतातील काही भागात कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

‘एल निनो’ चा मान्सूनवर परिणाम

दरम्यान, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ परिस्थिती विकसित होण्याची चिन्हे दिसत असून, याचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच हिंद महासागरातील ‘आयओडी’ सध्या तटस्थ असून, मान्सूनच्या उत्तरार्धात सकारात्मक स्थितीकडे झुकण्याचा अंदाज आहे.

या हवामान बदलांचा शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. जास्त पावसामुळे मातीतील ओलावा वाढून खरीप हंगामासाठी तयारीस मदत होणार असली, तरी काही भागात पाणी साचणे आणि बुरशीजन्य रोग वाढण्याचा धोका आहे. उष्णतेच्या लाटांमुळे पिकांवर ताण येऊन फळगळ आणि उत्पादनात घट होऊ शकते. यामुळे राज्य सरकारे व स्थानिक प्रशासनाने उष्णतेच्या लाटांसाठी आवश्यक तयारी ठेवावी, तसेच शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

एप्रिलमधील अवकाळी पाऊस आणि तापमानाचा खेळ

एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने उन्हाच्या कडेला काही प्रमाणात आळा बसला. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या; काही भागात गारपीटही झाली. या अवकाळी पावसामुळे दिवसाच्या कमाल तापमानात चढ-उतार दिसून आला आणि काही दिवस तापमानात घटही नोंदली गेली. मात्र पावसानंतर पुन्हा उष्णतेची तीव्रता वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक शहरांत तापमानाने ४० अंशांच्या पुढे झेप घेतली, तर काही ठिकाणी उष्णतेची लाटही जाणवली. या बदलत्या हवामानामुळे शेतीपिकांवर ताण निर्माण झाला असून, फळबागांनाही फटका बसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.