अमरावती : विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदरा प्रसिद्ध आहे. येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक येत असतात. आता या पर्यटनात ‘स्काय वॉक’ची भर पडणार आहे. निसर्गाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खोल दरीतूच चालण्याचा आणि हवेतून झेपावण्याचा आनंद पर्यटकांना काही दिवसांत घेणार आहे. या ठिकाणी भारतातील सर्वात लांबीचा काचेचा पूल (स्काय वॉक) उभारला जात आहे. या पुलाच्या ‘डेक’चे काम पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात या स्काय वॉकचे लोकार्पण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पाचशे पर्यटकाचा भार सांभाळण्याची क्षमता

स्काय वॉकची उंची २८० मीटर (अंदाचे ५९४ फूट) आहे. या स्काय वॉकचे फ्लोअर १२ मिलीमीटर जाडीच्या त्रिस्तरीय काचेचे असणार आहे. एकाचवेळी ५०० पर्यटकांचा भार सांभाळण्याची तसेच प्रतितास १९० किलोमीटर गतीचा वारा झेलण्याची क्षमता या काचेची राहणार आहे. हरिकेन आणि गोराघाट यादरम्यान सर्वसाधारण वाऱ्याचा वेग ताशी १६० किलोमीटर असतो. या प्रकल्पावर सुमारे ४० कोटी रुपये खर्च होत आहेत. इंदूर येथील अॅपिकॉन कंस्ट्रक्शन कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या स्काय वॉकच्या ४० मीटर उंचीच्या पिलरच्या कामाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात होऊन प्रकल्प फेब्रुवारी २०२१ मध्ये पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते.

मात्र, सिडकोने आवश्यक त्या परवानग्या न घेताच काम सुरू केल्यामुळे परवानगीच्या फेऱ्यात हा महत्त्वपूर्ण प्रकल्प अडकला होता. वन मंत्रालयाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींची पूर्तता केल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला पुन्हा सुरूवात झाली. आता या पुलाच्या ‘डेक’चे काम पूर्ण झाले आहे. आता काच लावणे व इतर किरकोळ कामे केली जाणार आहेत. त्यासाठी काही कालावधी लागू शकतो. मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून त्या पद्धतीने कंत्राटदार कामाला गती देत असल्याचे दिसून येत आहे.

चिखलदरा येथे जंगल सफारी व व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे देशभरातून पर्यटकांची पहिली पसंती चिखलदरा आहे. कॉफीच्या बागा, प्रसन्न वातावरण, पशु-पक्षांच्या शेकडो प्रजाती, डोंगर दऱ्यांच्या या परिसरात निसर्गाच्या सानिध्यात रममाण होण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते.

चिखलदरा येथे स्काय वॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळू शकेल. स्काय वॉक हे चिखलदरासाठी एक महत्वाचे केंद्र ठरणार असून पर्यटकांचा ओघ वाढेल, असे चिखलदरा हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीवर्धन करंडे यांनी सांगितले.