नागपूर : इराणकडून आखाती भागातील विविध शहरांवर हल्ल्यांच्या बातम्या समोर येत असतानाही संयुक्त अरब अमिरातीतील फुजेरा शहरात वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. त्यामागचे मुख्य कारण समोर आले आहे.

इराण, अमेरिका आणि इस्राईल यांच्यात वाढत चाललेल्या युद्धजन्य तणावामुळे आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना संयुक्त अरब अमिरातीतील फुजेरा शहरात राहणारे भारतीय नागरिक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासनाची सतर्कता, भारतीयांची मोठी वस्ती आणि परस्पर सहकार्याची मजबूत भावना यामुळे येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे नागपूरचे रहिवासी अभय दूधनकर यांनी सांगितले.

सध्या दूधनकर हे संयुक्त अरब अमिरातीच्या पूर्व किनारपट्टीवरील फुजेरा शहरात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. दूरध्वनीवरून संवाद साधताना त्यांनी सांगितले की, फुजेरामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक राहतात. शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारण ६० ते ७० टक्के नागरिक भारतीय असल्यामुळे येथे भारतीय समाजाचे मजबूत जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिक परस्परांना मदत करण्यासाठी तत्पर असतात.

फुजेरामधील परिस्थिती तुलनेने शांत

अलीकडे इराणकडून बैलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या साहाय्याने काही प्रत्युत्तरात्मक कारवाया झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आखाती भागात काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी फुजेरामधील परिस्थिती तुलनेने शांत असल्याचे दूधनकर यांनी स्पष्ट केले.

“कधीकधी दूरवर हल्ल्यांचे आवाज ऐकू येतात आणि बातम्यांमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात चर्चा होते. मात्र स्थानिक प्रशासन अत्यंत सतर्क आहे. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे राबविल्या जात असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण नाही,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सावधगिरीचा उपाय म्हणून काही भारतीय नागरिकांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक भारतीय नागरिक नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने येथेच राहणे पसंत करत आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला नसून कार्यालयीन कामकाज आणि व्यापार व्यवहार सुरळीत सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

इंडियन सोशल क्लब

फुजेरामध्ये कार्यरत असलेल्या ‘इंडियन सोशल क्लब’च्या माध्यमातून भारतीय नागरिक एकत्रितपणे संपर्कात राहतात. या क्लबच्या माध्यमातून भारतीय दूतावासाशी संपर्क साधणे सोपे होत असून कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी तातडीने मदत उपलब्ध होते. स्थानिक सरकार आणि भारतीय दूतावासही भारतीय नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढत असला तरी फुजेरामधील दैनंदिन जीवनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. विमानसेवाही नियमित सुरू असून नागरिक आपापल्या कामकाजात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे येथे वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहनही दूधनकर यांनी केले.