वृक्ष, वन क्षेत्रात ५१८८ चौरस किलोमीटरची वाढ

२०१४ ते २०१८ या चार वर्षांत भारताच्या वृक्ष आणि वन क्षेत्रात १३ हजार २०९ चौरस किलोमीटर वाढ झाली आहे.

भारतीय वनसर्वेक्षण अहवाल जाहीर 

काँक्रिटच्या जंगलांचे वाढते प्रमाण, विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड, वनसंपत्तीची तस्करी आणि जागतिक हवामान बदलामुळे जंगल नष्ट होत असल्याची चिंता जगभर व्यक्त होत असताना भारताच्या बाबतीत मात्र एक आशादायी बातमी आहे. भारताचे वृक्ष आणि वन क्षेत्र गेल्या दोन वर्षांत पाच हजार १८८ चौरस किलोमीटरने वाढले आहे.

भारताच्या वृक्ष आणि वन क्षेत्रात गेल्या दोन वर्षांतील या वाढीचे प्रमाण ०.६५ टक्के आहे. २०१७ मध्ये हे क्षेत्र आठ लाख दोन हजार ८८ चौरस किलोमीटर होते, तर २०१९ मध्ये ते आठ लाख सात हजार २७६ चौरस किलोमीटर झाले आहे.

२०१४ ते २०१८ या चार वर्षांत भारताच्या वृक्ष आणि वन क्षेत्रात १३ हजार २०९ चौरस किलोमीटर वाढ झाली आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदलमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी भारतीय वन सर्वेक्षण अहवाल जाहीर केला. त्यातील ही माहिती आहे. दाट, मध्यम आणि विरळ असे जंगलाचे तीन प्रकार आहेत. या तिन्ही प्रकारच्या जंगलात वाढ झाली आहे. वन क्षेत्रातील वाढ ही तीन हजार ९७६ चौरस किलोमीटर असून वृक्ष क्षेत्रात एक हजार २१२ चौरस किलोमीटर इतकी वाढ आहे. समुद्राचे पर्यावरण सांभाळणाऱ्या खारफुटीच्या जंगलातदेखील ५४ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. यात गुजरात राज्य आघाडीवर असून त्या ठिकाणी ३७ चौरस किलोमीटर, महाराष्ट्रात १६ चौरस किलोमीटर तर ओडिशामध्ये आठ चौरस किलोमीटर खारफुटीचे जंगल वाढले आहे.

आशादायी चित्र

देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी १६.५१ टक्के पहाडी क्षेत्र. येथील वन क्षेत्रातही ५४४ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. देशातील आदिवासी जिल्ह्य़ांतील एकूण वन क्षेत्र चार लाख २२ हजार ३५१ चौरस किलोमीटर आहे. ते एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३७.५४ टक्के आहे. सध्याच्या मूल्यांकनानुसार, ७४१ चौरस किलोमीटरने हे क्षेत्र घटले असले तरीही बाहेरच्या क्षेत्रात मात्र एक हजार ९२२ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. देशातील बांबूचे क्षेत्रफळ अंदाजे एक लाख ६० हजार ०३७ चौरस किलोमीटर आहे. त्यात तीन हजार २२९ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. आगीच्या प्रमाणात २०१८ पेक्षा २० टक्क्यांनी घट झाली आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे.

महाराष्ट्रात १८ वर्षांत १८ कोटी वृक्षवाढ

महाराष्ट्रात फळबागांचे क्षेत्र वाढले आहे. महाराष्ट्रात आंबा, बोर आणि डाळिंबाच्या तीन कोटी वृक्षांची लागवड होते आणि सुमारे ९० ते ९५ टक्के वृक्ष जगतात. गेल्या १८ वर्षांत महाराष्ट्रात १८ कोटी वृक्ष वाढले आहेत.

पाच राज्ये आघाडीवर

कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, जम्मू आणि काश्मीर तसेच हिमाचल प्रदेश ही पाच राज्ये वृक्ष आणि वन क्षेत्राच्या वाढीत आघाडीवर आहेत. मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय आणि नागालँड या राज्यांतील वन क्षेत्रात घट झाली.

कार्बन उत्सर्जन घटवण्याच्या दिशेने

भारताच्या जंगलांतील कार्बनचा साठा सात हजार १२४.६ दशलक्ष टनच्या जवळपास आहे. २०१७च्या मूल्यांकनात हा साठा सात हजार ८२ दशलक्ष टन इतका होता. गेल्या दोन वर्षांत या साठय़ात ४२.६ दशलक्ष टन इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे भारताने पॅरिस करारात कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य ठरवले होते, ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे, असे या अहवालात म्हटले आहे. सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian forestry report released akp

ताज्या बातम्या