भारतीय न्यायव्यवस्थेची संपूर्ण इमारत ही केवळ कायद्याच्या पुस्तकांवर, कायद्यांच्या जडवेल्हाळ चर्चेवर उभी राहिलेली नाही. लोकशाही व्यवस्थेचा अपरिहार्य भाग म्हणून आणि या व्यवस्थेतील जनतेला विश्वास व दिलासा देणारा स्तंभ म्हणून याकडे पाहिले जाते. भारतीय न्यायपालिकेने अनेक खटल्यांमध्ये सर्वोच्च संवैधानिक व नैसर्गिक न्याय तत्त्वांच्या पालनाचे पायंडे निर्माण केलेले. कायदेमंडळ आणि कार्यपालिकेकडून न्याय मिळत नाही, तेव्हाच लोक न्यायपालिकेचे दार ठोठावतात. याचा अर्थ असा की, लोकशाहीच्या या दोन स्तंभांच्या तुलनेत न्यायपालिकेने अधिक संवेदनशील राहिले पाहिजे.

काही प्रकरणांत तसे होताना दिसत नाही. याचा प्रत्यय नागपुरात नुकताच आला. त्यामुळे न्यायपालिकेच्या विश्वासार्हतेला बाधा पोहोचते. न्यायव्यवहारशास्त्र सांगते की, ‘न्याय केवळ केला जाणे पुरेसे नाही, तो केला जात असल्याचे स्पष्ट दिसलेही पाहिजे.’ हे नैसर्गिक न्यायाचे सर्वमान्य सूत्र. यातूनच ‘नॉट बिफोर मी’ म्हणजेच न्यायाधीशांनी स्वतःला एखाद्या प्रकरणाच्या सुनावणीपासून दूर ठेवण्याच्या प्रथेचा जन्म झाला. अशाप्रकारे एखाद्या न्यायाधीशाने विशिष्ट परिस्थितीत एखाद्या खटल्यापासून स्वतःला दूर करण्याची संकल्पना ही भारतातील न्यायिक नीतिमत्ता आणि संवैधानिक व्यवस्थेचा आवश्यक घटक. जेव्हा एखादा न्यायाधीश हितसंबंधांचा संघर्ष, पूर्वग्रह किंवा इतर कोणत्याही कारणामुळे खटल्याची सुनावणी करण्यापासून माघार घेतो, ज्यामुळे त्याच्या निष्पक्ष राहण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, तेव्हा त्याला ‘नॉट बिफोर मी’ म्हणतात.

लोकशाहीमध्ये कायदा सर्वोच्च मानला जातो. त्यापुढे सगळे समान हे तत्त्व, प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले गेले पाहिजे हे दुसरे तत्त्व आणि स्वतःशी संबंधित मुद्यांवर स्वतः न्यायाधीश असू नये हे तिसरे महत्त्वाचे तत्त्व. अशा व्यवस्थेत न्यायालयांनी एक स्वतंत्र आणि निष्पक्ष संस्था म्हणून काम करण्यास सक्षम असले पाहिजे. पूर्वग्रहाचा अगदी छोटासा संशय देखील लोकांना न्याव्यवस्थेवरील विश्वासाला बाधा पोहोचवू शकतो. भारतात नॉट बिफोर मी या सिद्धांताचे नियमन करणारा कोणताही कायदा नाही. हा पायंडा असून तो घटनात्मक तत्त्वे, न्यायालयीन पूर्वदृष्टांत आणि नैतिक मानकांवर आधारलेला आहे. प्रत्येक खटला निष्पक्षपणे हाताळला जाईल याची खात्री करण्यासाठीच नव्हे, तर न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठीही विशिष्ट परिस्थितीत अमूक खटला आपल्यासमोर चालणार नाही, अशी भूमिका न्यायाधीशाने घेणे आवश्यक. न्यायालयीन माघार म्हणून ओळखले जाणारे हे तत्त्व यासाठी पाळले जाते की, कोणत्याही खटल्याच्या निकालावर न्यायाधीशांच्या वैयक्तिक पूर्वग्रहांचा कोणताही परिणाम होणार नाही.

भारतात एखाद्या खटल्यातून बाजूला होण्याचा निर्णय पूर्णपणे न्यायाधीशाच्या सद्सद्विवेकबुद्धीवर अवलंबून असतो. कोणताही पक्षकार, वकील किंवा बाह्य घटक न्यायाधीशाला खटल्यातून बाजूला होण्यास भाग पाडू शकत नाही हे खरे. पण, मार्गदर्शक तत्त्व म्हणून हा पायंडा नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाशी सुसंगत हेही तेवढेच खरे. कोणतीही व्यक्ती स्वतःशी संबंधित खटल्यात न्यायाधीश असू शकत नाही, हा नैसर्गिक न्यायाचा महत्त्वाचा भाग. न्यायाधीशाने कोणत्या स्थितीत ‘नॉट बिफोर मी’ करावे याचेही संकेत आहेत. प्रकरणात न्यायाधीशांचे नातेवाईक, मुलगा, मुलगी किंवा जवळचे स्नेही वकील म्हणून उपस्थित असतील; न्यायाधीशांनी भूतकाळात वकील म्हणून काम करताना संबंधित पक्षकाराचे प्रतिधित्व केलेले असेल किंवा त्या संस्थेला सेवा दिलेली असेल. संबंधित कंपनीत, ट्रस्टमध्ये किंवा संस्थेत स्वतःचे शेअर्स अथवा हितसंबंध असतील ही त्यातली महत्त्वाची. कधी कधी काही न्यायाधीश स्वतःच्या व्यावसायिक भूतकाळाची किंवा संस्थात्मक हितसंबंधांची पूर्ण जाणीव असूनही स्वतःला या प्रकरणांतून वेगळे करत नाहीत. प्रकरण न्यायालयात उपस्थित केल्यानंतरही ‘माझी निष्पक्षता अबाधित आहे’ किंवा ‘हा न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे’ असा युक्तिवाद करत हट्टाग्रहाने सुनावणी सुरू ठेवतात. त्यांचे हे वर्तन न्यायपालिकेच्या मूल्यांना तडे देणारे. अशाप्रकारचा आग्रह हा न्यायमूर्तींच्या वैयक्तिक अहंकारातून किंवा संस्थात्मक श्रेष्ठत्वाच्या वृथा भावनेतून येतो.

कोणताही न्यायाधीश हा कायद्यापेक्षा मोठा नसतो. अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणात अत्यंत परखडपणे नमूद केले होते की, न्यायाधीश हे काही पवित्र किंवा अलौकिक जीव नाहीत; तेही याच समाजाचा आणि लोकशाहीचा भाग आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयांवर, वर्तनावर व नैतिक भूमिकेवर समाजात आणि माध्यमांत निरोगी व कायदेशीर चर्चा होणे लोकशाहीसाठी अत्यंत गरजेचे. चर्चा तेव्हाच होते जेव्हा काही तरी दोष असतो. तो आहे हेच अशा न्यायाधीशांच्या वर्तनातून सिद्ध होते. इतिहासात न्याधीशांच्या माघारीशी संबंधित अनेक प्रसंग घडलेत. रामजन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात सुनावणी सुरू असताना, न्यायमूर्ती यू.यू. लळीत यांच्याकडे हे प्रकरण आले. पक्षकारांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, १९९४ मध्ये वकील असताना लळीत यांनी या प्रकरणाशी संबंधित एका गुन्हेगारी खटल्यात एका पक्षाचे वकील म्हणून काम केले होते. यावर त्वरित आणि नैतिक भूमिका घेत न्यायमूर्ती लळीत यांनी स्वतःहून त्या खंडपीठातून माघार घेतली. पश्चिम बंगालच्या तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. हे प्रकरण न्यायमूर्ती कौशिक चंदा यांच्यासमोर आले. चंदा हे न्यायमूर्ती होण्यापूर्वी एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या (भाजप) लीगल सेलचे काम पाहत होते, असा आक्षेप घेण्यात आला.

न्यायमूर्ती चंदा यांनी वैयक्तिक निष्पक्षतेवर संशय घेण्याच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत दंडात्मक कारवाई केली, परंतु प्रकरणाचे गांभीर्य आणि जनमानसातील प्रतिमा लक्षात घेऊन शेवटी स्वतःला त्या प्रकरणापासून दूर ठेवले. भारतात न्यायाधीशांच्या ‘माघार घेण्याबाबत’ कोणताही संहिताबद्ध किंवा लिखित कायदा नाही हे खरेच. ते संपूर्णपणे संबंधित न्यायाधीशाच्या ‘विवेकबुद्धीवर’ आणि ‘नैतिकतेच्या भानावर’ सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतातरी यात सुधारणा व्हायला हवी. न्यायाधीशांनी कधी आणि कोणत्या परिस्थितीत ‘नॉट बिफोर मी’ वापरले पाहिजे, याचे स्पष्ट आणि बंधनकारक नियम ठरवले जाणे काळाची गरज आहे. तेव्हाच नागपूरसारखा प्रसंग पुन्हा घडणार नाही.

न्यायाधीशाने माघार घेतली किंवा माघार घेण्यास नकार दिला, तर त्याची स्पष्ट कायदेशीर कारणे आदेशात नमूद केली पाहिजेत, त्या कारणांना पदावर असण्याचा दर्प नको. न्यायाधीशाचा व्यक्तिगत हट्ट किंवा अहंकार हा संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या विश्वासाला तडा देऊ शकतो. जेव्हा एखादा पक्षकार किंवा वकील न्यायाधीशाच्या भूतकाळातील व्यावसायिक संबंधांकडे अंगुलिनिर्देश करतो, तेव्हा न्यायालयाने तो ‘आपला अपमान’ न मानता न्यायदानाच्या पवित्रतेचा भाग मानला पाहिजे. न्यायव्यवस्था ही केवळ कायदे सांगणारी यंत्रणा नसून ती नागरिकांच्या हक्कांची ढाल आहे. न्यायाधीशांनी ‘न्यायाधीश सांगतो तोच न्याय’ या अहंभावातून बाहेर पडून ‘नॉट बिफोर मी’ या तत्त्वाचा आदर केला तरच लोकशाहीतील या स्तंभाची प्रतिष्ठा आणि जनतेचा विश्वास अभंग राहील.