नागपूर : मद्यउद्योग म्हटले की केवळ मद्यविक्री आणि करांचे उत्पन्न डोळ्यांसमोर येते. मात्र, या उद्योगाची आर्थिक व्याप्ती त्यापलीकडे असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. भारतातील मद्यनिर्मिती आणि विक्रीशी संबंधित उद्योगाची बाजारपेठ २०२५ मध्ये ६.२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. या उद्योगातून केंद्र आणि राज्य सरकारांना २०२४-२५ मध्ये सुमारे ४ लाख कोटी रुपयांचा कर मिळाल्याचा अंदाज आहे. शेती, वाहतूक, हॉटेल व्यवसाय आणि किरकोळ विक्री अशा विविध क्षेत्रांतील सुमारे १.४४ कोटी रोजगारांनाही या उद्योगाचा आधार असल्याचे अहवालात नमूद आहे.
हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आणि त्यात काय म्हटले आहे?
आंतरराष्ट्रीय मद्य आणि मद्यनिर्मिती उद्योग संघटनेने (आयएसडब्ल्यूएआय) ७ ऑक्टोबर रोजी ‘भारतीय मद्यउद्योगाचे आर्थिक मूल्य २०२६’ हा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, २०२५ मधील उद्योगाची बाजारपेठ देशाच्या नाममात्र सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे १.८ टक्के आहे.
सरकारला किती कर मिळतो?
२०२४-२५ मध्ये या उद्योगातून केंद्र आणि राज्य सरकारांना मिळून सुमारे ४ लाख कोटी रुपयांचा कर मिळाल्याचा अंदाज आहे. हे देशाच्या एकूण करसंकलनाच्या ६.६ टक्के, तर अप्रत्यक्ष करांच्या ११.३ टक्के आहे. अहवालानुसार, २८ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या स्वकर उत्पन्नात मद्यविक्रीशी संबंधित महसुलाचा वाटा सरासरी सुमारे १९ टक्के आहे.
या उद्योगाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो?
मद्यनिर्मितीसाठी धान्य, ऊस, मळी, सातू आणि द्राक्षे यांसारख्या कृषिमालाची गरज असते. त्यामुळे या पिकांना बाजारपेठ उपलब्ध होते. सुमारे २४.२ ते २५.५ लाख शेतजमिनींवर या उद्योगासाठी लागणाऱ्या कृषिमालाचे उत्पादन होत असल्याचा अंदाज आहे. यातून १.२१ ते १.२८ कोटी शेतकऱ्यांच्या उपजीविकेला आधार मिळतो.
रोजगार आणि अन्य उद्योगांशी किती संबंध आहे?
मद्यविक्रीशी संबंधित हॉटेल, उपाहारगृहे आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यवसायांनाही फायदा होतो. मद्यविक्रीचा अन्न आणि पेय सेवा क्षेत्रातील उत्पन्नात १४ ते १९ टक्के वाटा असल्याचा अंदाज आहे. परवानाधारक मद्यविक्री केंद्रे आणि मद्यसेवा देणाऱ्या खाद्यव्यवसायांत ९.२ ते ११ लाख रोजगार आहेत. याशिवाय, संघटित किरकोळ मद्यविक्रीत सुमारे ४.८ लाख रोजगार आहेत. शेती, खाद्यसेवा आणि किरकोळ विक्री या क्षेत्रांतील रोजगार मिळून सुमारे १.४४ कोटी रोजगारांना या उद्योगाचा आधार असल्याचे अहवाल सांगतो.
पुढील वाढीसाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या?
२०२२ ते २०२५ या काळात महागड्या मद्याच्या विक्रीत वार्षिक सरासरी १०.२ टक्के वाढ झाली. तुलनेत स्वस्त मद्यात १.१ टक्के आणि नियमित श्रेणीतील मद्यात १.४ टक्के वाढ झाली. तसेच, देशातील काचेच्या बाटल्यांच्या मागणीपैकी सुमारे ७० टक्के मागणी या उद्योगाशी संबंधित आहे. कररचना, परवाना व्यवस्था आणि वितरणातील नियम अधिक सुसंगत केल्यास गुंतवणूक व रोजगार वाढण्यास मदत होईल, असे अहवालात नमूद आहे.
