अकोला : रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या फुकट्यांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. विनातिकीट, अवैध तिकीट प्रवास करणाऱ्या सुमारे २९ हजार प्रवाशांना दंड ठोठावून त्यांच्याकडून १.७२ कोटी रुपयांची वसुली केली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने मे महिन्यात तिकीट तपासणी मोहिमेमध्ये इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.
व्यापक मोहिमेत विनातिकीट व अनियमित प्रवाशांना पकडले
मे महिन्यांत नांदेड विभागातील विविध रेल्वे गाड्या व स्थानकांवर व्यापक तिकीट तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण २८ हजार ९४४ विनातिकीट व अनियमित प्रवाशांची प्रकरणे आढळून आली आहेत. त्यातून एक कोटी ७२ लाख ८५ हजार ४६० रुपयांची वसुली करण्यात आली. नांदेड विभागाच्या इतिहासात एका महिन्यात तिकीट तपासणीद्वारे मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे.
विशेष व दंडाधिकारी तपासणी मोहीम
प्रवाशांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच प्रवास नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आल्या. यामध्ये तीन व्यापक तिकीट तपासणी मोहिमा, तर एक दंडाधिकारी तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ३३ तिकीट तपासणी पथक कर्मचारी, १७४ कर्मचारी आणि १८ रेल्वेस्थानक कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या मोहिमेमध्ये रेल्वे सुरक्षा बलाशी सुरक्षा पुरवत समन्वय साधला. महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर आणि प्रमुख रेल्वे गाड्यांमध्ये मोहीम राबवून विनातिकीट व अनियमित प्रवासाच्या प्रकरणांचा शोध घेतला. महसूल गळती रोखण्यासह अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यास मोहिमेतून मदत झाली.
सुरक्षा वाढीसह डब्यांमधील गर्दी कमी होण्यास मदत
तिकीट तपासणी मोहिमांचा उद्देश केवळ महसूल वाढ नाही. वैध तिकीट खरेदी करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि विनाअडथळा प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा त्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यांमधील अनधिकृत प्रवास आणि इतर प्रवासातील अनियमितता रोखल्यामुळे डब्यांमधील गर्दी कमी होण्यास मदत होते. तसेच प्रवाशांची सुरक्षा वाढते, शिस्त कायम राहते आणि प्रवासाचा दर्जा सुधारतो. सर्व रेल्वे प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवासी हिताची रेल्वे व्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. या प्रकारची मोहीम नियमितपणे राबवली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
