अमरावती : भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट आरक्षणासाठी नवीन ओटीपी आधारित प्रमाणीकरण प्रणाली टप्प्या-टप्प्याने अंमलात आणण्याचा निर्णय घेतला असून अमरावती-पुणे एक्स्प्रेससह मध्य रेल्वेवरील पाच रेल्वेगाड्यांमध्ये तत्काळ तिकीट आरक्षणासाठी ही नवीन ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली लागू करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ११०५० पुणे-अमरावती एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०२९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोंडा गोदान एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस जयनगर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१५७ पुणे – सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांमध्ये ओटीपी आधारित प्रमाणीकरण प्रणाली १९ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.

काय आहे नवीन प्रणाली?

ही नवीन प्रणाली संगणकीकृत पीआरएस खिडकी, अधिकृत दलाल, तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळ आणि अॅपद्वारे आरक्षित करण्यात येणाऱ्या तत्काळ तिकिटांसाठी लागू आहे. या प्रक्रियेनुसार आरक्षणाच्या वेळी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर प्रवाशांना एकदाच वापरता येणारा संकेतांक (ओटीपी) प्राप्त होईल. ओटीपीची यशस्वी पडताळणी झाल्यानंतरच तत्काळ तिकीट जारी करण्यात येईल. पुढील काही दिवसांत उर्वरित सर्व गाड्यांवर ते लागू केले जाईल.

या उपाययोजनेचा उद्देश पारदर्शकता अधिक मजबूत करणे, गैरवापर रोखणे तसेच तत्काळ कोट्यातील बुकिंगचा लाभ खऱ्या प्रवाशांपर्यंत पोहोचवणे हा आहे. तत्काळ तिकीट आरक्षणाच्या वेळी गैरसोय टाळण्यासाठी मोबाइल क्रमांक अचूकपणे नोंदवावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

भारतीय रेल्वेवरील नियमित रेल्वे गाड्यांसह विशेष रेल्वे गाड्यांची तिकिटे आरक्षित करण्यास प्रचंड कसरत करावी लागते. तर, प्रतीक्षा यादीतील तत्काळ तिकिटे मिळत असल्याने, प्रवाशांना रेल्वे प्रवासापासून वंचित राहावे लागते. भारतीय रेल्वेमध्ये तत्काळ तिकीट काढताना गडबड होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले. तत्काळ तिकिटाचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांत तिकिटे प्रतीक्षा यादीत जातात, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य

तत्काळ तिकिटाला खूप मागणी असते, त्यामुळे काउंटरवर लांब रांगा लागतात. आता जेव्हा एखादा प्रवासी काउंटरवर तिकीट बुक करेल, तेव्हा त्याच्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यानंतरच तिकीट कन्फर्म होईल. यामुळे बनावट बुकिंग थांबेल आणि खऱ्या प्रवाशांना फायदा होईल.

रेल्वेनुसार, जुलै २०२५ मध्ये ऑनलाइन तत्काळसाठी आधार-आधारित प्रमाणीकरण जोडले गेले होते, जे फसवणूक कमी करण्यात उपयुक्त ठरले. आता काउंटर बुकिंगलाही याच प्रकारे सुरक्षित केले जात आहे.