Indian Railways job cuts : नागपूर : भारतीय रेल्वेत आगामी २०२६-२७ आर्थिक वर्षात मनुष्यबळ सुसूत्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार देशभरातील मंजूर पदांच्या दोन टक्के पदांची कपात करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे देशातील विविध रेल्वे झोन आणि उत्पादन युनिट्समधील मिळून सुमारे २९ हजार ६०८ पदे कमी होणार आहेत.
रेल्वे बोर्डाचे संचालक अमित सिंह मेहरा यांनी २४ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व विभागीय रेल्वे, उत्पादन युनिट आणि अन्य विभागांसाठी मंजूर मनुष्यबळाच्या दोन टक्के पदांचे मनुष्यबळाचे सुसूत्रीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. यामध्ये पदांचे पुनर्वितरण आणि अनावश्यक पदे रद्द करण्याचा समावेश आहे. ही प्रक्रिया ‘एचआरएमएस’ पोर्टलमार्फतच राबवण्याचे निर्देश देण्यात आले.
रेल्वे बोर्डाने झोननिहाय निश्चित केलेली उद्दिष्टे वार्षिक कार्यक्षमतेच्या सामंजस्य करारांमध्ये समाविष्ट केली आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागीय महाव्यवस्थापकांना या लक्ष्यांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. तसेच वर्षअखेरीस मोठा ताण येऊ नये म्हणून ही प्रक्रिया तिमाही आधारावर पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे देशातील सर्व प्रमुख झोनवर परिणाम होणार आहे. उत्पादन युनिट्समध्येही मनुष्यबळ कपातीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सला २१४, रेल कोच फॅक्टरीला १४७, मॉडर्न कोच फॅक्टरीला २१७, बनारस लोकोमोटिव्ह वर्क्सला ११५ आणि पाटियाला लोकोमोटिव्ह वर्क्सला ६९ पदांचे सुसूत्रीकरण करावे लागणार आहे. रेल व्हिल फॅक्टरी आणि रेल्वे संशोधन व विकास संस्था (आरडीएसओ) यांनाही स्वतंत्र लक्ष्य देण्यात आले आहे.
रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, १ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेल्या मंजूर पदसंख्येच्या आधारे ही २ टक्के कपातीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. देशभरातील रेल्वेतील एकूण मंजूर पदसंख्या १४ लाख ८० हजार ४५५ इतकी असून, त्यानुसार हे सुमारे २९ हजार ६०८ पदांचे सुसूत्रीकरण अपेक्षित आहे.
कामाचा ताण वाढण्याची शक्यता
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, आधीच रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असताना नव्या कपात धोरणामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढण्याची शक्यता ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे झोनल सरचिटणीस व ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉईज फेडरेशनचे संयुक्त सचिव संजय सोनारे यांनी व्यक्त केली आहे.
उत्तर रेल्वेत ३३०३ पदांचे सुसूत्रीकरण
उत्तर रेल्वेला सर्वाधिक ३३०३ पदांचे सुसूत्रीकरण करावे लागणार असून, मध्य रेल्वेला २४९२, पश्चिम रेल्वेला २३३९, पूर्व रेल्वेला २५४४ आणि दक्षिण रेल्वेला १९०६ पदांचे लक्ष्य देण्यात आले आहे. ईशान्य सीमांत रेल्वेला १४४६, उत्तर मध्य रेल्वेला १६६७, पूर्व मध्य रेल्वेला १९२२, पश्चिम मध्य रेल्वेला १३११ आणि दक्षिण पश्चिम रेल्वेला ८९३ पदांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. दक्षिण मध्य रेल्वेला १२५५, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला १९०८, तर दक्षिण पूर्व रेल्वेला ११८४ पदांचे पुनर्वाटप किंवा समर्पण करावे लागणार आहे.
