Indian Railways lower berth booking : नागपूर : रेल्वे प्रवासात खालचे आसन (लोअर बर्थ) मिळावा, अशी अनेक प्रवाशांची इच्छा असते. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांसाठी लोअर बर्थ अधिक सोयीचा ठरतो. काही पर्यायांचा योग्य वापर आणि नियोजन केल्यास लोअर बर्थ मिळण्याची शक्यता वाढू शकते.
रेल्वेचे नियम काय आहेत?
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात खालचा बर्थ अधिक आरामदायी मानला जातो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शारीरिक अडचणी असलेल्या प्रवाशांसाठी वरच्या बर्थवर चढणे-उतरणे त्रासदायक ठरू शकते. रेल्वेच्या नियमांनुसार महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना खालचा बर्थ देण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, वाढती प्रवासी संख्या आणि मर्यादित जागांमुळे प्रत्येक वेळी इच्छित बर्थ मिळेलच, याची खात्री नसते. त्यामुळे आरक्षण करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे आवश्यक ठरते.
बर्थ पसंतीचा पर्याय निवडणे आवश्यक
रेल्वे तिकीट बुक करताना ‘बर्थ पसंती’ हा पर्याय दिला जातो. अनेक प्रवासी घाईगडबडीत हा पर्याय भरत नाहीत. मात्र, खालचा बर्थ हवा असल्यास ‘खालचा बर्थ’ हा पर्याय स्पष्टपणे निवडणे आवश्यक आहे. रेल्वेची संगणकीकृत प्रणाली प्रवाशांनी दिलेल्या पसंतीनुसार जागा वाटप करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे योग्य पर्याय निवडल्यास खालचा बर्थ मिळण्याची शक्यता वाढते. विशेष म्हणजे, ६० वर्षांवरील पुरुष आणि ४५ वर्षांवरील महिलांना रेल्वेकडून प्राधान्य दिले जाते.
खालचा बर्थ मिळाल्यासच आरक्षण
तिकीट आरक्षण प्रक्रियेदरम्यान “खालचा बर्थ मिळाल्यासच तिकीट आरक्षित करा” हा पर्यायदेखील उपलब्ध असतो. खालचा बर्थ अत्यावश्यक असल्यास हा पर्याय निवडणे फायदेशीर ठरते. कारण, खालचा बर्थ उपलब्ध नसल्यास तिकीट आरक्षित होत नाही. त्यामुळे नको असलेली जागा मिळण्याची शक्यता टाळता येते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्यांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरतो.
ज्येष्ठ नागरिक कोट्यातून वाढते शक्यता
प्रवासात ज्येष्ठ नागरिक सोबत असल्यास ‘ज्येष्ठ नागरिक कोटा’ निवडणे फायदेशीर मानले जाते. सामान्य आरक्षणाच्या तुलनेत या कोट्यात खालचा बर्थ मिळण्याची शक्यता अधिक असते. रेल्वे प्रशासन वृद्ध प्रवाशांच्या सोयीचा विचार करून त्यांना प्राधान्याने खालच्या जागा उपलब्ध करून देते. त्यामुळे चढ-उतार करताना होणारा त्रास कमी होतो. अनेकदा या कोट्यातून आरक्षित जागा सहज उपलब्ध होण्यास मदत मिळते.
आगाऊ आरक्षण आणि टीटीईशी संपर्क उपयुक्त
रेल्वे तिकीट शक्यतो लवकर आरक्षित करणे फायदेशीर मानले जाते. आगाऊ आरक्षण केल्यास पसंतीची जागा मिळण्याची शक्यता वाढते. तरीही खालचा बर्थ मिळाला नाही, तर प्रवासादरम्यान तिकीट तपासनीसाशी संपर्क साधता येतो. राखीव जागा रिक्त असल्यास नियमांनुसार त्या इतर प्रवाशांना दिल्या जाऊ शकतात. त्यामुळे नम्रपणे विनंती केल्यास काही वेळा खालचा बर्थ मिळण्यास मदत होऊ शकते.
