अमरावती: रेल्वेच्या आरक्षित डब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणे आता महाग ठरणार आहे. याशिवाय विनातिकीट प्रवास, महिलांसाठी राखीव डब्याचा गैरवापर, तिकीट हस्तांतरण यासारख्या प्रकारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. रेल्वे कायदा, १९८९ मधील प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून दंडाच्या रकमेत घशघशीत वाढ करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने या सुधारित नियमांची माहिती देत प्रवाशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
काय आहेत नवे नियम?
-कलम १३७: योग्य पास, तिकिटाशिवाय फसवणूक करून प्रवास करणे यासाठी १ हजार रुपयांपर्यंत दंड, ६ महिन्यांपर्यंत कारावास किंवा दोन्ही, अशी तरतूद पुर्वी होती. आता सुधारित तरतुदीनुसार भाडे अधिक अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. ज्याची किमान रक्कम ५०० रुपये असेल. जर दोषी व्यक्तीने पैसे भरण्यास नकार दिला, तर प्रकरण न्यायालयात पाठवले जाईल. पैसे न भरल्यास, न्यायालय ६ महिन्यांपर्यंत कारावास, ५०० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावू शकते.
आरक्षित डब्यात अनधिकृत प्रवेश केल्यास..
-कलम १५५: आरक्षित डब्यात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर जादा दंड आकरण्यात येणार आहे. यापूर्वी ५०० रुपयांपर्यंत असलेला दंड आता २ हजार रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. तसेच अधिकृत प्रवाशांना डब्यात प्रवेश करण्यास अडथळा आणल्यास १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. दंड भरण्यास नकार दिल्यास प्रकरण न्यायालयात जाऊ शकते आणि न्यायालय ३ हजार रुपयांपर्यंत दंड तसेच डब्यातून बाहेर काढण्याची कारवाई करू शकते.
महिलांसाठी राखीव डब्यात अनधिकृत प्रवेश…
-कलम १६२: महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांसाठीही नियम कठोर करण्यात आले आहेत. अशा प्रकरणात आता २ हजार ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. संबंधित व्यक्तीने दंड न भरल्यास न्यायालयाकडून ५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.
तर तिकीट होणार जप्त
-कलम १४२: तिकीट हस्तांतरणाच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. दुसऱ्या व्यक्तीचे तिकीट वापरणे किंवा अनधिकृत व्यक्तीकडून तिकीट खरेदी करणे यावर कारवाई केली जाईल. तिकीट जप्त करून प्रवासाचे भाडे आणि अतिरिक्त शुल्क वसूल केले जाईल. रक्कम न भरल्यास न्यायालय सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा २ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते.
